किनवट : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहचारिणी त्यागमुर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त किनवट शहरातील त्यागमुर्ती माता रमाबाई चौक येथे जयंती कार्यक्रम उत्साहात व भक्तीभावाने साजरा करण्यात आला.
यावेळी आयोजित कार्यक्रमात किनवट नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सुजाता येंड्रलवार, पोलिस निरिक्षक गणेश कराड, नगरसेविका ललिता मुनेश्वर, बांधकाम सभापती श्रीराम नेम्मानिवार यांनी माता रमाबाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले तसेच रमाबाई यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत त्यांच्या त्याग, संघर्ष आणि समर्पणाच्या कार्याची आठवण यावेळी करण्यात आली.
कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी सांगितले की, माता रमाबाई यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बाबासाहेब आंबेडकरांना साथ देत समाज परिवर्तनाच्या लढ्यात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या त्याग, संयम आणि समाजावरील प्रेमामुळेच बाबासाहेबांना मोठे कार्य करण्यासाठी बळ मिळाले. त्यामुळे समाजातील महिलांनी त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन शिक्षण, सामाजिक कार्य आणि आत्मसन्मान यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमाला पोलिस हेड कोन्स्टेबल प्रकाश बोदमवाड, नितिन कदम, शिवा अनंतवार, गंगुबाई परेकार, प्रा. जयश्री भरणे, पुष्पांजली कांबळे, अश्विन भरणे, अनिल कांबळे, विद्या पाटील, विजया खाडे, मयुरी कांबळे, निवेदक कानिंदे, ब्राम्हा एड्के यांच्यासह शहरातील महिला, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी माता रमाबाई यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून करण्यात आले असून कार्यक्रम शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.






















