सोलापूर – आजच्या स्पर्धात्मक व तणावपूर्ण वातावरणात विद्यार्थी वर्गावर अभ्यासाचा ताण, मोबाईल व सोशल मीडियाचा वाढता वापर, एकाग्रतेचा अभाव तसेच मानसिक अस्वस्थता यांचा परिणाम दिसून येतो. अशा परिस्थितीत ध्यान व श्वसनाधारित साधना विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. ध्यानामुळे एकाग्रता, स्मरणशक्ती व अभ्यासातील लक्ष वाढते, असे प्रतिपादन पिरॅमिड मास्टर नेहा मिरजगावकर यांनी केले.
सोलापूर पिरॅमिड स्पिरिच्युअल ट्रस्टच्यावतीने माजी महापौर स्व. महेश विष्णुपंत कोठे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विडी घरकुल येथील संभाजीराव शिंदे प्रशालेत दि. १ जानेवारी २०२६ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत सकाळी ७.३० ते ८.३० वाजेपर्यंत ध्यान शिबिर आयोजित केले होते. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी कविता मिरजगावकर, प्रीती सदारंगानी, आनंद गांगजी, रोहित वंगारी, श्रीनिवास पुला, मुख्याध्यापक सतीश मल्लाव आदीजण उपस्थित होते.
त्या पुढे म्हणाल्या की, महेश कोठे हे ध्यानाचे महत्व ओळखून जुना विडी घरकुल येथे गणेश पिरॅमिड ध्यान केंद्र स्थापन करून दिले. ते सातत्याने ध्यान करत होते. शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांना वर्तमान क्षणात पूर्णपणे जगण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. विचारांची गर्दी कमी करून मन स्थिर ठेवण्याचे, आणि प्रत्येक कृतीत जागरूकतेने सहभागी होण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. ध्यान सत्रांदरम्यान शाळेतील वातावरण शांततेने न्हाऊन निघाले होते. प्रत्येक सत्रात विद्यार्थ्यांनी डोळे मिटून श्वासाच्या लयीत स्वत:कडे वळण्याचा अनुभव घेतला. त्यांच्या चेहऱ्यांवरील शांततेचा आणि समाधानाचा भावच या प्रशिक्षणाचे यश दर्शवत होता.
शिबिरानंतर विद्यार्थ्यांनी सांगितले की, ध्यानामुळे त्यांच्या मनातील अस्थिरता कमी झाली असून अभ्यासात एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढला आहे. शिक्षकांनीही या उपक्रमाचे कौतुक करत सांगितले की अशा सत्रांमुळे विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य सुधारते आणि त्यांची विचारशक्ती अधिक सशक्त होते.
संभाजीराव शिंदे प्रशाला व सोलापूर पिरॅमिड ट्रस्ट यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी केवळ शैक्षणिक नाही, तर जीवनमूल्यांची जाणीव करून देणारा ठरला. शांततेच्या या प्रवासात प्रत्येक विद्यार्थ्याने स्वत:च्या मनाशी नवे नाते जोडले — आणि हाच या ध्यान प्रशिक्षणाचा सर्वात मोठा यशाचा क्षण ठरला.
फोटो आहे.
























