जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांचे निलंबन करण्यात आल्यामुळे या विभागाचा अतिरिक्त पदभार महिला व बालकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांना देण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी बुधवारी तसे आदेश काढले.

पुणे विभागीय समाजकल्याण विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी मंगळवारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खामीतकर यांना निलंबित करण्यात येत असल्याचे आदेश जारी केले. जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी या पदावर लातूर जिल्हा परिषद कार्यरत असताना खमितकर यांच्या प्रशासकीय कामकाजातील विविध त्रुटी व शासकीय अधिकाऱ्यांशी अशोभनीय वर्तन याबाबत त्यांची सेवा समाप्ती करण्याबाबत शासनास प्रस्तावित करण्यात असल्याचे आयुक्त बकोरिया यांनी जारी केलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे. लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रास्तावित केल्यानुसार खमितकर हे वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करत नाहीत, आढावा बैठकीस वारंवार विनापरवानगी अनुपस्थित राहणे, सन्माननीय सदस्यांच्या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात न घेणे तसेच त्यांचे काम असमाधानकारक असणे . याबाबत मसुदा शासनास सादर करण्यात आला होता. तसेच खमितकर यांच्या कामकाजात अनुषंगाने विविध सामाजिक संघटना व लोकप्रतिनिधी यांच्याकडून विविध तक्रारी प्राप्त झाल्या असल्याचे निलंबन आदेशात नमूद करण्यात आले आहे. खमितकर यांना निलंबित करण्यात आल्याचे कळताच जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे.


















