सांगोला – रेल्वे क्र.७१४२१ व ७१४२२ मिरज-कुर्डूवाडी रेल्वेचा विस्तार कोल्हापूर-सोलापूर-कलबुर्गी पर्यंत करण्यात यावा अशी मागणी मध्य रेल्वे मुंबई विभागाचे महाव्यवस्थापक यांच्याकडे निवेदनाद्वारे सांगोल्यातील शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.
सध्या ही रेल्वे कुर्डूवाडी-मिरज पर्यंत धावत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. दोन्ही दिशेला प्रवाशांना अर्धवट प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे सदर रेल्वेचा विस्तार कोल्हापूर-कुर्डूवाडी-सोलापूर-कलबुर्गीपर्यंत सर्व थांबे घेऊन आवश्यक आहे. परिणामी रेल्वेचे उत्पन्न वाढून प्रवाशांची सोय होणार आहे. या निवेदनाच्या प्रती संघटनेने विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुणे, सोलापूर व कोल्हापूर सांगली तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व खासदारांना पाठपुरावा करण्याकरिता दिलेल्या आहेत. यावेळी संघटनेचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
कुर्डूवाडी जंक्शनहून पंढरपूर, मिरज व कोल्हापूरकडे जाण्याकरिता प्रवाशांना दु.१.३० नंतर किमान १९ तास रेल्वे सेवा उपलब्ध नाही. हा वेळेचा मोठा गॅप आहे. प्रवाशांची त्यामुळे मोठी गैरसोय होत आहे. त्याकरिता या मिरज-कुर्डूवाडी रेल्वेचा विस्तार केल्यास सोलापुरातून दररोज दु.३ वा. या रेल्वेचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. याकरिता अशोक कामटे संघटना रेल्वे विभागाकडे पाठपुरावा करीत आहे.
-निलकंठ शिंदे, अध्यक्ष, अशोक कामटे संघटना सांगोला.




















