मुंबई, 22 जून (हिं.स.) : येत्या काही दिवसात महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकीची तारीख कधीही जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात हालचालींना वेग आला आहे. अशातच वरळीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्याविरोधात पोस्टर्स लावल्याची माहिती समोर आली आहे. या पोस्टरवर आदित्य ठाकरेंना विधानसभेत पाडण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे वरळीत ठाकरेंची शिवसेना विरुद्ध मनसे असा सामना रंगताना दिसत आहे.
काय लिहलंय पोस्टरवर ?
बर्फातला प्राणी बर्फातच पाठवूया ! जनमनातला आमदार, संदीप वरळीत आणूया ! वरळीचे भावी आमदार (मनसे नेते) श्री. संदीप देशपांडे सन्माननीय राज ठाकरे यांचा विश्वासू शिलेदार … विधानसभेत पाठवूया … यंदा वरळीकरांचं ठरलंय, असा मजकूर या पोस्टर्सवर लिहण्यात आला आहे. मनसे कार्यकर्ते हर्षल खरात यांनी हे पोस्टर्स लावले आहेत. आदित्य ठाकरे हे शिवसेना ठाकरे गटाचे वरळी विधानसभेतील विद्यमान आमदार आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे हे पहिल्यांदा निवडणुकीत उतरले होते. ठाकरे घरातील पहिली व्यक्ती निवडणूक लढत असल्याने राज ठाकरे यांनी त्यांच्याविरोधात कोणताही उमदेवार दिला नव्हता. मात्र, यंदा आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मनसेकडून संदीप देशपांडे हे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.