सोलापूर – महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ मधील भाजपाचे उमेदवार किसन जाधव, दत्तात्रय नडगिरी, अंबिका नागेश गायकवाड आणि चैत्राली गायकवाड यांच्या पॅनलला मोची समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. प्रभाग २२ मध्ये मोची समाजाची मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या वास्तव्यास असल्याने हा पाठिंबा निवडणुकीत निर्णायक ठरणार असल्याचे सांगण्यात आले.
मोची समाजाच्या सांस्कृतिक भवनासाठी शासन स्तरावरून ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्याबद्दल भाजप उमेदवार किसन जाधव यांचे विशेष आभार मानण्यात आले. तसेच सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी मोची समाजाच्या विकासासाठी २ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर केल्यामुळे समाजाच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्नांना गती मिळाल्याचे नमूद करण्यात आले. मोची समाजाचे शहर-जिल्हाध्यक्ष तथा माजी स्थायी समिती सभापती देवेंद्र भंडारे म्हणाले की, गेल्या पंधरा वर्षांत आमदार प्रणिती शिंदे यांनी मोची समाजाचा केवळ निवडणूकपुरता वापर केला. समाजाच्या मूलभूत प्रश्नांसाठी ठोस निर्णय घेतले गेले नाहीत. मात्र भाजप सरकार आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रत्यक्ष निधी उपलब्ध करून समाजाच्या विकासाला चालना दिली आहे. त्यामुळे भाजपच आमचा खरा पाठिंबा आहे.
दरम्यान, राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे यांच्या उपस्थितीत रेवणसिद्धेश्वर मंदिर परिसरात भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य कॉर्नर सभा पार पडली. या सभेत परिसरातील मतदारांनी भाजप पॅनलला उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला. यावेळी जेम्स जंगम, नागनाथ कासलोलकर यांच्यासह मोची समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

























