तभा फ्लॅश न्यूज/ बदनापूर : छत्रपती संभाजीनगर–जालना महामार्गावर भीषण अपघातात मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही हृदय पिळवटून टाकणारी घटना बदनापूर पोलीस ठाण्यासमोर घडली.
मृत व्यक्ती राखी पौर्णिमेनिमित्त जालना तालुक्यातील काळेगाव येथे राहणाऱ्या बहिणीकडे जात होते. मोटारसायकल (क्र. एम.एच. २० जि.टी. २६७४) वरून जात असताना बस (क्र. एम.एच. १४ एम.एच. १६७९) ने जोरदार धडक दिली. धडकेनंतर ते बसच्या मागील चाकाखाली सापडले आणि जागीच ठार झाले.
अपघात एवढा भीषण होता की साक्षीदारांनी काही क्षण डोळे मिटून घेतले. या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हातगाड्या, रिक्षा व इतर वाहने उभी राहिल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो व अपघातांचा धोका वाढतो. काही महिन्यांपूर्वीही याच ठिकाणी अशाच प्रकारचा अपघात झाला होता.
घटनेनंतर पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक उपनिरीक्षक यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती, मात्र पोलिसांनी दुसऱ्या बाजूने वाहतूक सुरू करून अडथळा दूर केला. मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.