मुंबई, 3 जुलै (हिं.स.) – महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई झोनल युनिटच्या अधिकाऱ्यांनी नुकतेच बँकॉकहून आलेल्या एका प्रवाशाकडून 5 कोटी रुपयांचा गांजा जप्त केला आहे.
विशिष्ट गुप्तचर माहितीच्या आधारे डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकहून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या आणि त्याच्या सामानात/ किंवा व्यक्तिशः अंमली पदार्थ सोबत आणले असल्याचा संशय असलेल्या प्रवाशाला हेरले. त्याच्या सामानाची अतिशय बारकाईने तपासणी केल्यावर चंदेरी रंगाच्या प्रत्येकावर विविध फळांच्या खुणा असलेली 9 व्हॅक्युम पॅक्ड पाकिटे सापडली. या सर्व पाकिटांमध्ये हिरवट रंगाचे गाठींसारख्या स्वरुपातील पदार्थ सापडले. त्यांची एनडीपीएस टेस्ट किट ने तपासणी केल्यावर तो पदार्थ गांजा असल्याची पुष्टी झाली.
गाठींच्या स्वरुपातील या हिरवट पदार्थाचे वजन 5.34 किलो होते, ज्याचे मूल्य 5 कोटी रुपये असून ते जप्त करण्यात आले आणि संबंधित प्रवाशाला अटक करण्यात आली आणि त्याला एनडीपीएस कायदा 1985 अंतर्गत न्यायालयीन कोठडी देण्यात आली.