सोलापूर : महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या निकालांचे अधिकृत राजपत्र आज प्रसिद्ध करण्यात आले. यामुळे १०२ प्रभागांतील निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांच्या निवडीला कायदेशीर मान्यता मिळाली असून, नव्या महापालिका स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. सोलापूर महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी हे आज प्रसिद्ध केले आहे.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ-पुणे विभागीय पुरवणी सोमवार दि.१९ जानेवारी २०२६ रोजी
प्राधिकृत प्रकाशन करण्यात आले आहे. आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी या निवडणूक निकालाचे प्रकटन केले आहे. गुरुवार, दि. १५ जानेवारी २०२६ रोजी घेण्यात आलेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या २६ प्रभागांच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या एकूण १०२ सदस्यांची नावे, प्रभागाचे ठिकाण व पक्ष महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ मधील अनुसूची “ड”, प्रकरण १ मधील (निवडणूक नियम) ३९ (२) नुसार प्रभागनिहाय प्रसिध्द करण्यात आले आहे.
राजपत्रात प्रत्येक प्रभागातून निवडून आलेल्या उमेदवारांची नावे, पक्षनिहाय तपशील तसेच निवडणूक प्रक्रियेची अधिकृत नोंद समाविष्ट करण्यात आली आहे. यासोबतच निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार ही निवड अंतिम ठरल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. राजपत्र प्रकाशनानंतर प्रशासकीय पातळीवर पुढील कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. राजपत्र प्रसिद्ध झाल्याने आता महापौर, उपमहापौर व स्थायी समिती निवडीच्या प्रक्रियेला वेग येणार आहे.
या निवडणुकीत भाजपाने तब्बल ८७ जागा जिंकत महापालिकेवर निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. एमआयएम, शिवसेना (शिंदे गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना मर्यादित जागांवर समाधान मानावे लागले. नव्या महापालिकेकडून शहर विकास, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि नागरी सुविधा याबाबत ठोस निर्णयांची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
असे आहेत पुढील टप्पे :
— महापालिका सभेची पहिली बैठक
— महापौर–उपमहापौर निवड
— स्थायी समिती व विषय समित्यांची स्थापना
‘राजपत्र’ म्हणजे काय ?
राजपत्र (Government Gazette) म्हणजे शासन किंवा निवडणूक आयोगाकडून प्रसिद्ध केलेली अधिकृत अधिसूचना आहे. निवडणूक निकाल राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतरच तो कायदेशीरदृष्ट्या अंतिम मानला जातो. या अधिसूचनेत निवडून आलेल्या उमेदवारांची नावे, प्रभाग क्रमांक व पक्षनिहाय तपशील नमूद असतो.
राजपत्र प्रसिद्ध होईपर्यंत निकाल अनौपचारिक (तात्पुरता) असतो. राजपत्रानंतरच महापालिका स्थापन, पहिली सभा, तसेच महापौर–उपमहापौर निवड प्रक्रिया सुरू होते.
कोणताही कायदेशीर वाद किंवा निवडणूक याचिकेसाठी राजपत्र हा अधिकृत संदर्भ दस्तऐवज मानला जातो. राजपत्र म्हणजे निकालावर शासनाचा अधिकृत शिक्का. आणि राजपत्र प्रसिद्ध होणे म्हणजे निवडणूक प्रक्रियेचा शेवट आणि नव्या सत्ताकाळाची औपचारिक सुरुवात असते.
महापालिका पक्षनिहाय बलाबल :
भाजपा – ८७
एमआयएम – ०८
शिवसेना (शिंदे गट) – ०४
काँग्रेस – ०२
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – ०१


















