सोलापूर : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीनंतर सोमवारी सकाळी महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहेत. तत्पूर्वी कौन्सिल हॉल इमारतीतील सभागृह नेत्यांचे कार्यालय असलेले पंडित दीनदयाळ उपाध्याय सभागृह आणि महापौर कार्यालय नेटक्या पद्धतीने सुसज्ज ठेवण्यात आले आहे.
सोलापूर महापालिकेतील महापौर आणि उपमहापौर निवडणुकीसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत आहेत. सर्वाधिक जागा जिंकलेल्या भाजपाचे गटनेते यांच्यासह अन्य सदस्य आज सोमवारी सकाळीच सभागृह नेत्यांचे कार्यालय असलेले पंडित दीनदयाळ उपाध्याय सभागृह येथे येणार आहेत. त्यानंतर महापालिका नगरसचिव कार्यालयात महापौर, उपमहापौर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल. यासाठी हे सभागृह सुसज्ज ठेवले आहे.
सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाने 87 जागा जिंकल्या आहेत. यामुळे 87 नगरसेवकांना बसण्याची व्यवस्था पंडित दीनदयाळ उपाध्याय सभागृहात करण्यात आली आहे. यापूर्वी याच सभागृहात भाजपचे 49 सदस्य असल्याने तेवढीच व्यवस्था होती मात्र यंदा भाजपा नगरसेवकांची संख्या 38 ने वाढल्याने मधील पडदी काढून सभागृनेतेच्या कार्यालयाचा विस्तार केला आहे. यामुळे साधारणतः 120 जणांना बसण्याची व्यवस्था केली आहे. सुसज्ज असे हे कार्यालय करण्यात आले आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय सभागृह या नामफलकाखाली मोठ्या आकाराचे कमळ साकारले आहे. अँटी चेंबर तसेच कर्मचाऱ्यांसाठी बसण्याची वेगळी व्यवस्था केली आहे.
त्याचबरोबर महापौर यांचे संपूर्ण कार्यालय सज्ज करण्यात आले आहे. येथील सोफासेट, खुर्च्या व इतर सर्व नेटके व्यवस्था केली आहे. येथील अँटी चेंबर व्यवस्थित ठेवण्यात आले आहे. आवश्यक ती साधनसामग्री ही लावण्यात आली आहे.

























