सोलापूर : सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीनंतर सर्वाधिक 87 जागा जिंकलेल्या महापालिकेतील भाजपच्या गटनेतेपदी नरेंद्र काळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. दरम्यान आज पुणे येथे विभागीय आयुक्त यांच्याकडे भाजपाची गट नोंदणी करण्यात आली.
सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने घवघवीत यश यश मिळविले. सन 2017 च्या निवडणुकीच्या तुलनेने 38 जागा अधिक निवडून आणत एकूण 87 जागांवर आपला विजय संपादन केला. दरम्यान यापूर्वी सोलापूर महापालिका नगरसेवक यांच्याकडे गट नोंदणी करण्यात येत होती परंतु यंदा प्रथमच थेट पुणे विभागीय आयुक्तांकडे ही नोंदणी करण्यात येत आहे. त्यानुसार आज सकाळीच भाजपचे नगरसेवक लक्झरी आणि खाजगी वाहनाने पुण्याला रवाना झाले.
पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे भाजपा गट नोंदणी करण्यात आली. तसेच भाजपच्या गटनेतेपदी नरेंद्र काळे यांची सर्वानुमते निवड ही करण्यात आली. या निवडीची घोषणा भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी केली.
पालकमंत्री जयकुमार गोरे, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर व तिनही आमदारांच्या तसेच सर्व नगरसेवकांच्या वतीने या पदासाठी नरेंद्र काळे यांची निवड करण्यात आली. ही निवड करताना नरेंद्र काळे यांनी विरोधी पक्ष नेता असताना केलेले काम, शहराध्यक्ष असताना पक्ष बांधणीसाठी केलेले कार्य व सर्वांना सोबत घेऊन जाण्याची असलेली कसब या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून पक्षश्रेष्ठींनी भाजपाच्या गटनेतेपदी नरेंद्र काळे यांची निवड केली असल्याचे दिसून येते. भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी त्यांचे अभिनंदन केले.
नुकत्याच झालेल्या सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत पक्षीय बलाबल पाहता एकूण १०२ जागांपैकी
भाजपा – ८७, एमआयएम – ०८ , शिवसेना (शिंदे) – ०४, काँग्रेस – ०२ , राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.) – ०१ असे आहे. यातील पाच ही पक्षांनी आपापली गट नोंदणी पुण्यात केली आहे.
दरम्यान, आता महापौर आणि उपमहापौर कोण होणार ? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 ते 11.30 या वेळेत सोलापूर महापालिकेतील नगरसचिव कार्यालयात महापौर आणि उपमहापौर या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. त्यानंतर शुक्रवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक होणार आहे. पुणे विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी हे पिठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. बिनविरोध निवडणूक न झाल्यास हात वर करून मतदानाची नोंद करण्यात येणार आहे.
भाजपचे गटनेते नरेंद्र काळे यांचा
अल्प परिचय असा
भाजपचे गटनेते नरेंद्र काळे हे जुळे सोलापुरातील रहिवासी आहेत. ते 43 वर्षाचे असून शिक्षण सिव्हिल इंजिनियर झाले आहे. ते बांधकाम व्यवसायिक आहेत. यापूर्वी सन 2012 ते 2017 पर्यंत ते भाजपचे नगरसेवक होते. सन 2014 मध्ये मनपा स्थायी समिती सदस्य, सन 2016 मध्ये मनपा विरोधी पक्ष नेता, सन 2022 मध्ये भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष होते. त्यानंतर सन 2023 मध्ये ते सोलापूर शहर भाजपचे शहराध्यक्ष पदाची त्यांनी जबाबदारी सांभाळली आणि आता महापालिकेतील भाजपचे गटनेते म्हणून त्यांची निवड झाली आहे.
महापालिकेतील हे आहेत
विविध पक्षांचे गटनेते
भाजपा — नरेंद्र काळे
एमआयएम — वहिदा शेख
शिंदेसेना – अमोल शिंदे
काँग्रेस – चेतन नरोटे
राष्ट्रवादी काँग्रेस – वैभव हत्तुरे

























