देगलूर – सेवा, संवेदना आणि सामाजिक बांधिलकी यांचे उत्तम उदाहरण ठरलेल्या देगलूर तालुक्यातील सुंडगी येथील परिचारिका सत्यभामा भीमराव दिपके यांना आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल जेतवन शैक्षणिक सामाजिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ‘राष्ट्रीय आदर्श परिचारिका’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
जेतवन सामाजिक शैक्षणिक चॅरिटेबल ट्रस्ट, सुजायतपूर यांच्या वतीने दिला जाणारा आरोग्य क्षेत्रातील (खाजगी) ‘राष्ट्रीय आदर्श परिचारिका’ पुरस्कार सौ. सत्यभामा भिमराव दिपके यांना देऊन गौरविण्यात आले आहे. या पुरस्कारात गौरवपत्र, सन्मानचिन्ह देण्यात आले. देगलूर तालुक्यातील सुजायतपुर येथील अखिल भारतीय राष्ट्रीय महिला बौद्ध धम्म परिषदेत हा प्रदान करण्यात आला. यावेळी ट्रस्टच्या अध्यक्षा सावित्रीताई शेवाळकर, कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रा. छायाताई बोरकर तसेच पूजनीय भंतेजी पय्याबोधी यांची प्रमुख उपस्थिती होती.
सौ. सत्यभामा दिपके यांच्या सेवाभावी वृत्ती, प्रामाणिकपणा, संवेदनशीलता आणि ठाम सामाजिक बांधिलकी यामुळे सत्यभामा दिपके यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. परिचारिका म्हणून कर्तव्य बजावत असताना त्यांनी वैयक्तिक लाभापेक्षा समाजहिताला अग्रक्रम दिला. आरोग्य सेवा, सामाजिक मदत, शैक्षणिक जागृती व नैतिक मूल्यांची जोपासना या क्षेत्रांत त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय आहे. त्यांच्या कार्यामुळे समाजातील दुर्बल घटकांना न्याय, सन्मान व आत्मविश्वास मिळाला असून अनेक गरजू कुटुंबांना मोलाचा आधार लाभला आहे.
सातत्य, चिकाटी व माणुसकीची जाणीव ही त्यांच्या सेवाकार्याची ओळख ठरली आहे. कोणताही भेदभाव न करता समाजातील सर्व स्तरांतील लोकांसाठी त्यांनी सेवा उपलब्ध करून दिल्याने समाजात सकारात्मक परिवर्तन घडताना दिसत आहे. त्यांच्या कार्यामुळे सेवाभावी वृत्तीचा आदर्श निर्माण झाला आहे. हा सन्मान त्यांच्या निःस्वार्थ सेवेची पावती असून भविष्यातही अधिक जोमाने समाजोपयोगी कार्य घडत राहावे, अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली. यावेळी ट्रस्टचे पदाधिकारी, मान्यवर पाहुणे, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, सर्व स्तरांतून सत्यभामा भीमराव दिपके यांच्यावर अभिनंदन व भावी कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.























