सोलापूर : बौद्ध अनुयायांनी शिक्षण, नैतिक आचरण आणि आर्थिक चळवळ यांचा समन्वय साधला तरच समाजाचा सर्वांगीण विकास शक्य आहे. सामाजिक प्रगतीसाठी आर्थिक सक्षमीकरण महत्त्वाचे आहे. गरीब व झोपडपट्टी भागातील लोकांना कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी महिला बचत गटांची निर्मिती केली आहे, असे प्रतिपादन नवयान अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ. अरुणकुमार इंगळे यांनी केले.
भारतीय बौद्ध महासभा, शहर जिल्हा सोलापूर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मॉर्निंग ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. आंबेडकर उद्यान येथे वर्षावास समाप्ती व ‘प्रश्नोत्तरातून समग्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ ग्रंथ वाचन समाप्तीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. याप्रसंगी ते बोलत होत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष अण्णासाहेब वाघमारे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त कृषी संचालक आबासाहेब साबळे, माजी नगरसेवक अशोक जानराव, डॉ. ज्योत्स्ना कोरे व डॉ. सुरेश कोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुरस्कार प्राप्त उपसंपादक किरण बनसोडे, रत्नदीप कांबळे, धम्मरक्षिता कांबळे आणि डॉ. जगन्नाथ शिंगे यांचा सन्मान करण्यात आला.
डॉ. अरुणकुमार इंगळे पुढे म्हणाले, महिला बचत गट आणि सहकारी पतसंस्था यांच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांना आर्थिक बळ देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यातून समाजात आत्मनिर्भरतेची भावना निर्माण होत असून, डॉ. आंबेडकरांच्या विचारांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत आहे.त्यातून नवयान अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीची स्थापना झाली असून, अवघ्या सहा महिन्यांत ही पतसंस्था नफ्यात आली आहे.”
कार्यक्रमात आबासाहेब साबळे, अशोक जानराव, निर्मला कांबळे यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन नागसेन माने यांनी केले, तर आभार शाम शिंगे यांनी मानले.
या प्रसंगी सोलापूर शहरातील उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.