पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी पाषाण तलाव येथे भेट देऊन ‘बायो एन्जाईम्स’ वापरून जलपर्णीचा नैसर्गिक रित्या खात्मा करण्याच्या प्रयोगाची पाहणी केली. तसेच खराडी सारखा डासांचा प्रश्न पुणे शहरात इतरत्र उद्भवू नये म्हणून हा प्रयोग संपूर्ण पुणे शहरात कसा व्यवहार्य होईल याची माहिती घेतली.
पुण्यातीत खराडी नदीपात्रासोबत कात्रज, पाषाण, जांभुळकर तलाव आणि मुळामुठा नदीत जलपर्णीची मोठी समस्या आहे. येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढते. शिवाय पोषक वातावरण तयार होऊन डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होते.संपूर्ण पुणे शहराला डासांचा त्रास सहन करावा लागतो. ही जलपर्णी हटवण्याकरता महानगरपालिकेचा दरवर्षी करोडो रुपयांचा निधी खर्च होतो. शिवाय तरीही जलपर्णीची समस्या कायम राहते.या समस्येचे निराकरण करण्यासाठी आठ दिवसांपूर्वी पुणे महानगरपालिकेने पाषाण तलावात एक अनोखा प्रयोग सुरू केला आहे. या तलावातील पाण्यात बायो एन्झाईम्सची पाकिटे सोडून पाण्यातील चांगल्या बॅक्टेरियांच्या मदतीने जलपर्णीला आवश्यक घटक नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रयोगामध्ये पाण्याची ऑक्सिजन पातळीही वाढते.