नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हरियाणा, गोवा आणि लडाख या राज्य व केंद्रशासित प्रदेशांसाठी नवीन राज्यपाल (New Governors ) आणि नायब राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रपती भवन यांचेकडून जारी केलेल्या निवेदनानुसार, प्रा. अशीम कुमार घोष यांची हरियाणाचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, पुसपती अशोक गजपती राजू यांची गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
लडाखसाठीही मोठा बदल करण्यात आला असून जम्मू आणि काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री कविंदर गुप्ता यांची लडाख केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली आहे. लडाखचे विद्यमान नायब राज्यपाल ब्रिगेडियर (निवृत्त) बी.डी. मिश्रा यांनी नुकताच राजीनामा दिला होता, तो राष्ट्रपतींनी स्वीकारला आहे.
राष्ट्रपती भवनाच्या निवेदनात म्हटले आहे की, “लडाखचे नायब राज्यपाल ब्रिगेडियर (से. नि.) बी.डी. मिश्रा यांचा राजीनामा स्वीकारत राष्ट्रपतींनी कविंदर गुप्ता यांची नियुक्ती केली आहे.”
या नव्या नियुक्त्यांमुळे हरियाणा, गोवा आणि लडाखमध्ये प्रशासकीय पातळीवर नवे नेतृत्व कार्यरत होणार आहे.