बार्शी – महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी यांच्यावतीने संस्थास्तरावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमात बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी यांनी राष्ट्रीय सेवा योजना (NSS) व राष्ट्रीय छात्र सेना (NCC) यांच्या संयुक्त आयोजनातून उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
या स्वच्छता मोहिमेत सीनियर व ज्युनिअर विभागातील एकूण सुमारे ५०० विद्यार्थी-विद्यार्थिनी, स्वयंसेवक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. सीनियर विभागातील १५० स्वयंसेवकांसह सुमारे २५० विद्यार्थी, तर ज्युनिअर विभागातील जवळपास ३५० विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले. कॉलेजचा संपूर्ण मुख्य परिसर, कॉमर्स कॉलेजसमोरील भाग तसेच के.आय.आय.टी. विभागाचा परिसर स्वच्छ करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी, कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे व यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करुन स्वच्छता मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. उद्घाटन व पूजेचा मान बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेजचे नाईट वॉचमन बळीराम जगदाळे व महाराष्ट्र विद्यालय, बार्शी येथील सेवक मोतीराम काळे यांच्या हस्ते देण्यात आला. श्रमप्रतिष्ठेला दिलेला हा सन्मान उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.
याप्रसंगी संस्थेचे जनरल सेक्रेटरी पी. टी. पाटील यांनी मार्गदर्शन करताना, ‘स्वच्छता ही केवळ एक दिवसाची बाब न राहता ती प्रत्येकाच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनली पाहिजे. विद्यार्थी जीवनातच स्वच्छतेची सवय लागल्यास समाज अधिक सशक्त व सुसंस्कृत बनेल’, असा प्रेरणादायी संदेश दिला.
या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, जनरल सेक्रेटरी पी. टी. पाटील, जॉईंट सेक्रेटरी अरुण देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, विविध सर्व कॉलेजचे प्राचार्य सर्व शाळांचे मुख्याध्यापक आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली.
सदर उपक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. एस. बी. करंडे, कार्यक्रमाधिकारी डॉ. एम. ए. ढगे, प्रा. के. एम. माळी, राष्ट्रीय छात्र सेना प्रमुख , प्रा. के. बी. चपटे, आयक्यूएसी समन्वयक डॉ. बी. डी. लांडे, ग्रंथपाल श्रीमती ज्योती यादव, कार्यालयीन अधीक्षक भाऊसाहेब पाटील, सीनियर व ज्युनिअर विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने करण्यात आले.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी करुन विद्यार्थ्यांनी केलेल्या स्वच्छतेच्या कार्याचे विशेष कौतुक केले. गांधीजींच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीची जोड देणारा हा उपक्रम ठरला असून, “स्वच्छ परिसर — सुदृढ समाज” हा संदेश प्रभावीपणे समाजात पोहोचविण्यात आला.
























