आव्हाना – ग्रामीण भागात सध्या नवरी मिळत नसल्याने अनेक नवरदेव गंभीर अडचणीत सापडले आहेत. या परिस्थितीचा थेट फटका नवरदेवांसह त्यांच्या कुटुंबियांना, विशेषतः पित्यांना बसत असून अनेक वडील हतबल झाले आहेत. एकेकाळी साधेपणाने जुळणारी ग्रामीण लग्ने आता अटी-शर्ती, आर्थिक व्यवहार आणि सामाजिक दबावामुळे कठीण बनली आहेत.
नवरीवाल्यांच्या अपेक्षांचा वाढता डोंगर
आज नवरी पाहताना सर्वात आधी विचारली जाणारी अट म्हणजे मुलगा नोकरीवाला पाहिजे. सरकारी नोकरी असल्यास प्राधान्य दिले जाते. नोकरी नसेल तर लगेच पुढील प्रश्न — शेती जमीन किती आहे? स्वतःचं घर आहे का?
हेही नसेल तर स्वतःचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर असणे आवश्यक मानले जाते. या निकषांमध्ये न बसणारा कष्टकरी, मेहनती तरुण सहजपणे नाकारला जात आहे.
पाच-पाच लाख रुपयांचा हुंडा देण्याचे प्रस्ताव
नोकरी, जमीन किंवा घर नसल्यास काही ठिकाणी धक्कादायक पर्याय पुढे केला जात आहे.
“तुमची मुलगी आमच्या मुलाला द्या, आम्ही तुम्हाला पाच-पाच लाख रुपये हुंडा देतो,” असे प्रस्ताव दिले जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. हुंडा कायद्याने गुन्हा असतानाही पैशाच्या जोरावर विवाह ठरवण्याची प्रवृत्ती वाढत असल्याने समाजाची अधोगती स्पष्ट होत आहे.
लग्नाआधीच अटींची यादी ग्रामीण भागात शेती हा मुख्य व्यवसाय असतानाही अनेक नवरीवाले लग्न जुळण्याआधीच अट घालतात की, “आमची मुलगी शेतात जाणार नाही.” शेती जमीन, उत्पन्न आणि स्थैर्य अपेक्षित; मात्र शेतीचे कष्ट नकोत, अशी भूमिका घेतली जात असल्याने नवरदेवांच्या कुटुंबावर आर्थिक व मानसिक ताण वाढत आहे.
‘साट-लोट’ची सक्ती अनेक ठिकाणी अजूनही ‘साट-लोट’ची अट लादली जाते.
“तुमची मुलगी आमच्या मुलाला द्या, आमची मुलगी तुमच्या मुलाला द्या,” असा प्रस्ताव नाकारल्यास विवाह बोलणी तुटतात. या प्रथेमुळे अनेक कुटुंबे अडचणीत सापडत असून मुला-मुलींच्या आयुष्यावर जबरदस्तीने निर्णय लादले जात आहेत.
टोकाच्या तडजोडी स्वीकारण्याची वेळ
नवरी मिळत नसल्याने काही नवरदेवांवर टोकाच्या तडजोडी स्वीकारण्याची वेळ येत आहे.
“मुलगी घटस्फोटित असली तरी चालेल, विधवा असली तरी चालेल, दोन मुले असलेली असली तरी चालेल; पण आमच्या मुलाला तुमची मुलगी द्या,” अशी मागणी होत असल्याचे चित्र आहे. हे वास्तव ग्रामीण नवरदेवांची अवस्था किती गंभीर झाली आहे, हे अधोरेखित करते.
लग्न न जुळल्याने वाढते व्यसनाधिनतेचे प्रमाण
लग्न होत नसल्याने अनेक तरुण नैराश्यात जात असून काही नवरदेव दारू, तंबाखू आदी व्यसनांच्या आहारी जात असल्याचे चिंताजनक वास्तव समोर येत आहे. समाजाकडून होणारी थट्टा, वाढते वय, वारंवार नकार आणि भविष्याची अनिश्चितता यामुळे मानसिक तणाव वाढत असून त्याचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर होत आहे.
नवरदेवांचे वडील हतबल मुलाचे लग्न न झाल्याने अनेक वडील सामाजिक दबावाखाली सापडले आहेत. गावातील टोमणे, नातेवाइकांचे प्रश्न आणि वाढती चिंता यामुळे अनेक पालक मानसिक त्रास सहन करत आहेत.
समाजाने आत्मपरीक्षण करण्याची गरज
विवाह हा व्यवहार नसून तो विश्वास, समजूतदारपणा आणि सहजीवनाचा निर्णय आहे. केवळ नोकरी, पैसा, जमीन, हुंडा आणि अटींवर विवाह ठरवले जात राहिले तर ग्रामीण भागातील असंख्य तरुणांसाठी संसार हे स्वप्नच राहील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
ग्रामीण भागातील नवरी न मिळण्याची समस्या आता वैयक्तिक न राहता गंभीर सामाजिक प्रश्न बनली आहे. वेळीच सामाजिक प्रबोधन, कायद्याची कठोर अंमलबजावणी आणि मानसिकतेत बदल झाला नाही, तर भविष्यात या समस्येचे परिणाम अधिक भयावह होतील, असा इशारा सुज्ञ नागरिकांकडून दिला जात आहे.

























