तभा फ्लॅश न्यूज/ पंढरपूर : श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर आणि परिवार देवतांच्या मंदिराच्या जतन, संवर्धन व जिर्णोद्वारासाठी १६ डिसेंबर २०२३ पासून शासनाच्या निधीतून पुरातत्त्व विभागामार्फत सुरू असलेल्या कामांमध्ये नुकत्याच झालेल्या पावसात गळती झाल्याचे उघडकीस आले आहे.
२२ व २६ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसात मंदिरात गळती झाल्यानंतर, मंदिर समितीने तत्काळ पुरातत्त्व विभागाशी पत्रव्यवहार करून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या संदर्भात कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर कामांचे गुणवत्तापूर्ण व आराखड्यानुसार होणारे काम सुनिश्चित करण्यासाठी त्रयस्थ शासकीय संस्थेमार्फत ऑडिट करण्याचा प्रस्ताव मा. जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.
-
मंदिर जिर्णोद्वाराची कामे डिसेंबर २०२३ पासून सुरू
-
पावसामुळे दोन वेळा गळती झाल्याचे निदर्शनास
-
वेळोवेळी मंदिर समितीच्या बैठकीत आढावा आणि सूचना
-
वॉटरप्रूफिंगची कामे पावसाळा लवकर सुरू झाल्यामुळे अपूर्ण
-
तातडीच्या उपाययोजना केल्याची पुरातत्त्व विभागाची माहिती
-
कामाचे त्रयस्थ शासकीय संस्थेमार्फत ऑडिट करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना
गेल्या काही दिवसांत पावसामुळे मंदिरात झालेल्या गळतीने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. त्यामुळे भाविकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात असून, यापुढील कामे अधिक पारदर्शक व दर्जेदार व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.