जालना – बदनापूर तहसील कार्यालय हे तालुक्यातील नागरिकांसाठी विविध शासकीय कामकाजाचे महत्त्वाचे केंद्र आहे. महसूल, पुरवठा, संजय गांधी निराधार योजना, मनरेगा, जातीचे दाखले, उत्पन्न प्रमाणपत्रे, फेरफार, जमीन व्यवहार अशी अनेक अत्यावश्यक कामे या कार्यालयातून केली जातात. मात्र, सध्या या कार्यालयात कामकाज सुरळीत पार पडत नसल्याची तक्रार वाढत चालली आहे.
नागरिकांनी केलेल्या तक्रारीनुसार तहसीलदार, नायब तहसीलदार तसेच काही अधिकारी हे दररोज जालना, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, देवळगाव राजा आदी ठिकाणांहून उप-डाऊन करत बदनापूर येथे येतात. परिणामी, कार्यालयीन वेळेत अधिकारी अल्प काळासाठीच उपस्थित राहतात. यामुळे नागरिकांच्या विविध कामांमध्ये मोठा विलंब होत असून, लोकांत नाराजीचा स्वर उमटू लागला आहे.
दूरवरच्या गावांहून येणाऱ्या नागरिकांना महसूल, जातीचे दाखले, राशन कार्ड, जमीन फेरफार यांसारख्या कामांसाठी अनेक वेळा तहसील कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. “साहेब आले नाहीत”, “सही बाकी आहे” अशा कारणांनी नागरिकांना परत जावे लागते. परिणामी शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगार आणि ज्येष्ठ नागरिक यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
स्थानिक सामाजिक संघटनांनीही या बाबतीत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सरकारी अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रात कायमस्वरूपी वास्तव्य करून नागरिकांची सेवा करणे अपेक्षित असताना, दररोजच्या उप-डाऊनमुळे जनतेचे नुकसान होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
बदनापूर तहसील कार्यालय हे नागरिकांच्या दैनंदिन प्रशासनाशी थेट संबंधित केंद्र असल्याने, संबंधित अधिकारी कायमस्वरूपी बदनापूर येथेच राहावेत, अशी मागणी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. तसेच, या अधिकाऱ्यांना उप-डाऊन करण्यास प्रशासनाची परवानगी आहे की नाही, याबाबत चौकशी करून तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून जोर धरू लागली आहे.

















