सोलापूर – मराठा सेवा संघ प्रणित छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेड, सोलापूर यांच्यावतीने निवासी जिल्हाधिकारी दिनेश बार्गे यांना शहर अध्यक्ष हाजी मतीन बागवान व जिल्हा अध्यक्ष शफी रचभरे यांनी निवेदन दिले.
सध्या सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये लाऊडस्पीकरद्वारे विद्यार्थ्यांना राष्ट्रगीत ऐकवले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वतः राष्ट्रगीत म्हणण्याचे प्रमाण फारच कमी झाले आहे. अनेक विद्यार्थ्यांना तर पूर्ण राष्ट्रगीत पण म्हणता येत नाही. याचा त्यांच्या बुद्धीवर परिणाम होत असून त्यांची स्मरणशक्ती कमी होत चालल्याचे निदर्शनास येत आहे म्हणून राष्ट्रगीत पूर्वीसारखे तोंडी म्हणण्याचे चालू करावे जेणेकरून विद्यार्थ्यांना हे पाठ होऊन भविष्यात त्यांना ते आठवणीत राहू शकते.
तसेच अशा प्रकारचे निवेदन छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेड, सोलापूर यांच्यावतीने सोलापूर महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासन अधिकारी, सोलापूर महानगरपालिका शिक्षण मंडळ यांना सर्व महानगरपालिका शाळांसाठी देण्यात आले. जिल्हा परिषद शाळांसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर जिल्हा परिषद यांनाही हे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी जावेद बद्दी उपस्थित होते.

























