बार्शी – तालुक्यातील उपळे दुमाला येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित वखारिया विद्यालयात कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या १२३ व्या जयंतीनिमित कर्मवीर सप्ताह आयोजनातील सहाव्या दिवशी आज बुधवार ४ फेब्रुवारी रोजी समाजदिन वैराग येथील प्रा. भोसले यांचे शिक्षणातील विद्यार्थी, पालक व शिक्षकांचे महत्त्व या विषयावरील व्याख्यानाने साजरा करण्यात आला.
प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक दयानंद रेवडकर सर, प्रमुख व्याख्याते प्रा.भोसले यांच्या हस्ते कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यालयातील सहशिक्षक डॉ. प्रशांत काशीद यांनी प्रास्ताविक तर मकरंद जगदाळे यांनी व्याख्यात्याचा परिचय करुन दिला.
दयानंद रेवडकर यांनी प्रा.भोसले यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. प्रा. भोसले यांनी आपले विचार मांडताना विद्यार्थ्याच्या जडणघडणीत, व्यक्तिमत्व विकासात शिक्षक व पालक यांचे योगदान महत्त्वाचे कसे हे अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले. सुखाची व्याख्या अगदी सरळ सोपी करुन सांगितली. आपल्या अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक रेवडकर सर यांनी लहानाची कदर आणि मोठ्याचा आदर केला तरच आपले जीवन सुखकारक बनते. तसेच आपले विचार समृद्ध होण्यासाठी अनुभवी माणसे वाचायला शिकले पाहिजे हे ही स्पष्ट केले.
कार्यक्रमाचा समारोप एन.एन. महाले यांनी उपस्थितांचे आभार मानून केला. कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख रमेश लंकेश्वर यांनी केले. याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.















