तीन दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात मूसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरणात या पावसामुळे दीड टीएमसी पाणी जमा झाले आहे. धरण परिसरातूनच पाण्याची आवक असून सध्या साडेसहा हजार क्युसेक पाणी धरणात येत आहे.
भीमा खोऱ्यातील पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज, डिंभे, घोड, विसापूर, चिल्हेवाडी, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, वडीवळे, आंद्रा, पवना, कासारसाई, मुळशी, वरसगाव, पानशेत, खडकवासला, गुंजवणी, निरा देवधर, भाटघर, वीर, नाझरे या धरणांमधील पाणीसाठा अद्याप सुधारलेला नाही. यातील खडवासला, वडीवळे, येडगाव, आंद्रा, पवना ही धरणे वगळता उर्वरित सर्वच धरणांमधील पाणीसाठा २० टक्क्यांपेक्षाही कमी आहे. पिंपळगाव जोगे, घोड या धरणांनी तळ गाठला आहे.
उजनी धरणाच्या वरील बाजूला असलेली ही सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याशिवाय उजनी धरणात पाणी येत नाही. उजनी धरणात पुणे जिल्ह्यातील बंडगार्डन, दौंड येथून विसर्ग येतो. सध्या मुळसधार पाऊस पडत असतानाही तेथून विसर्ग उजनीत येत नाही. दुष्काळामुळे भीमा खोऱ्यातील सर्वच धरणांमधील पाणीसाठा कमी झालेला आहे. उजनी धरणात सध्या धरण परिसरातून विसर्ग जमा होत असल्याने दुष्काळाने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.