सोलापूर – श्री मल्लिकार्जुन हायस्कूल व रखमाबाई हत्तरे कनिष्ठ महाविद्यालय हत्तुरे नगर,सोलापूर व कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग,जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त व्यक्तिमत्व विकास व किमान रोजगार क्षमता कौशल्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरास महाविद्यालयाचे मार्गदर्शक धरेपा हत्तुरे,प्र. प्राचार्य रमेश दिंडोरे, प्रमुख व्याख्याते ड्रीम फाउंडेशनचे अध्यक्ष काशिनाथ भतगुणकी,जिल्हा कौशल्य विकासचे समन्वयक सिद्धप्पा बनसोडे,एम प्रोफेशनल तृष्णा गायकवाड, जिल्हा कौशल्य विकासचे कर्मचारी रेश्मा विद्याधर,सुहास डोईफोडे यांच्या शुभहस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मान्यवरांच्या शुभहस्ते प्रमुख अतिथींचे शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख व्याख्याते काशिनाथ भतगुणकी यांनी विद्यार्थ्यांनी वाचन, श्रवण,लेखन,संभाषण व व्यवसाय कौशल्य कसे विकसित करावे,कौशल्य विकसित करण्यासाठी सराव करणे,कष्ट करणे महत्त्वाचे आहे,व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा करावा याविषयी विनोदी शैलीमध्ये मार्गदर्शन केले. तसेच यावेळी लखन भिंगे,श्रेयस कांबळे,प्रिया लिगाडे आदी विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्त्वाचा विकास करत स्वतः मधील कौशल्याचा विकास करू अशी ग्वाही दिली.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्रा.प्रशांत हरके,विरेश हचडे व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिलकुमार गावडे यांनी केले,सूत्रसंचालन रमेश आगवणे यांनी केले,तर सर्व उपस्थितांचेआभार प्राध्या.लक्ष्मीकांत पनशेट्टी यांनी मानले.

























