सोलापूर : स्वच्छ सोलापूर – सुंदर सोलापूर करण्यासाठी “आपलं सोलापूर – आपला अर्थसंकल्प” या संकल्पनेच्या आधारावर शहरातील नागरिकांच्या सूचना मागविण्यात येत आहेत. दि. 13 ते 15 मार्च दरम्यान या सूचना महापालिकेतील सूचनापेटी,मोबाईल ॲप, ब्लॉग, क्यू आर कोड या द्वारे मागविण्यात येत आहेत. नागरिकांनी सोलापूर शहर विकासासाठी आपल्या सूचना पाठवाव्यात, असे आवाहन महापालिका स्थायी समितीच्या सभापती रंजीता चाकोते यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
सोलापूर महापालिका अंदाजपत्रकाची तयारी सुरू आहे. या अंतर्गतच सोलापूरकरांच्या भावना या अंदाजपत्रकात समाविष्ट होणे आवश्यक आहे. त्यांची मते सूचना जाणून घेऊन हे अंदाजपत्रक तयार करण्यात येणार आहे. त्यामुळेच “आपलं सोलापूर – आपला अर्थसंकल्प” या अनुषंगाने नागरिकांच्या सूचना मागविण्यात येत आहेत. रस्ते, पाणी, स्वच्छता आणि इतर बाबतीत नागरिकांच्या सूचना अभिप्रेत आहेत. नागरिकांची मते आणि सूचना लक्षात घेऊन भाजपच्या वचनपूर्तीचे अंदाजपत्रक तयार करण्यात येणार आहे. हे अंदाजपत्रक फुगवटा नसणार आहे तर वास्तववादी विकासात्मक अंदाजपत्रक राहील, असा विश्वास सभापती रंजीता चाकोते यांनी यावेळी व्यक्त केला. दिनांक 13 ते दिनांक 13 ते 15 मार्च 2026 या कालावधीत सोलापुरातील नागरिकांकडून या सूचना मागविण्यात येत आहेत. या सूचना नोंदविण्यासाठी विविध माध्यमांची उपलब्धता महापालिकेने केली आहे. यामध्ये मोबाईल ॲप, क्यू आर कोड, ब्लॉग यांचा समावेश आहे. सोलापूर शहरात विविध ठिकाणी डिजिटल फलकावर क्यूआर कोडची सोयही करण्यात आली आहे. नागरिकांनी याला प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही सभापती रंजीता चाकोते यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेत महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर , सभागृह नेते नरेंद्र काळे, नगरसेवक गणेश वानकर, शिवाजी वाघमोडे, बिज्जू प्रधाने यांच्यासह नगरसेवक , नगरसेविका उपस्थित होत्या.
मिळकत करातील शास्ती, दंड
माफ करण्याचा विचार : महापौर कोंड्याल
सोलापूर महापालिकेच्या मिळकत कराची थकबाकी वसूल व्हावी यासाठी मिळकतकरातील शास्ती, दंड माफी करण्याचा विचार सुरू आहे. त्याचबरोबर सुपर टॅक्स संदर्भातही येणाऱ्या महापालिका सभेत निर्णय घेण्यात येणार आहे. महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. सोलापूर शहरात ज्या ठिकाणी महापालिकेच्या जागा आहेत त्या ठिकाणी मिनी व मेजर गाळे बांधण्या संदर्भातही चर्चा करण्यात येणार आहे, असे महापौर विनायक कोंड्याल यांनी स्पष्ट केले.
नळ नाही तिथे पाणीपट्टी आकारणी यावरही पुनर्विचार
ज्या ठिकाणी नळ नाही त्या ठिकाणी पाणीपट्टी आकारण्यात येते याबाबत नागरिकांमधून नाराजी आहे. त्या संदर्भातही चर्चा करून निर्णय घेण्यात येईल,. या संदर्भात बोर्डात चर्चा करण्यात येणार आहे. पनाश टॉवरप्रकरणी वापर परवाना रद्द करण्याचे आदेशही देण्यात येणार आहेत. सोलापूर महापालिकेचे अंदाजपत्रक हे सर्व समावेशक राहणार आहे. जमाखर्चाचा ताळमेळ लावून विकास कामे केली जातील, असे महापौर विनायक कोंड्याल यांनी सांगितले.


























