भिवंडीत एक धक्कादायक घटना घडली असून आधी झालेल्या भांडणाच्या रागातून अल्पवयीन मुलाची हत्या करुन नंतर मृतदेह जमिनीत पुरल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नारपोली पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना १४ डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.
अल्पवयीन मुलाचे वय १६ वर्ष ५ महिने असून तो भिवंडीतील काल्हेर परिसरात राहत होता. २५ नोव्हेंबर रोजी तो अचानक बेपत्ता झाला. त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला. मात्र, तो न सापडल्याने २८ नोव्हेंबरला नारपोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी या मुलाचा शोध चालू केला. कॉल डिटेल्स रेकॉर्ड आणि अन्य तांत्रिक तपास करत १९ वर्षांच्या दोन तरुणांना ताब्यात घेत त्यांना अटक केली. त्यांच्या चौकशीमध्ये पाच ते सहा महिन्यापूर्वी आरोपी आणि अल्पवयीन मुलगा यांच्यात भांडणे झाली होती. याच रागातून हत्येचा हा प्रकार घडल्याची बाब समोर आली आहे. आरोपींनी आपआपसात संगनमत करुन अल्पवयीन मुलाची शस्राने वार करुन हत्या केली. नंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने रेतीबंदर खाडीच्या बाजूला मृतदेह पुरल्याची बाब निष्पन्न झाली.
गुरुवारी मुलाचा मृतदेह जमिनीतून बाहेर काढण्यात आला, अशी माहिती पोलिसांनी दिली. मृत मुलाच्या आईच्या तक्रारीनंतर नारपोली पोलिस ठाण्यात अपहरण, हत्या आणि अन्य भादंवि कलमातंर्गत गुन्हा दाखल झाला. दोन्ही आरोपी भिवंडीतील कामतघर परिसरात वास्तव्यास असून यातील एक आरोपी हमालीचे काम करतो. या गुन्ह्यात आणखीन काही आरोपींची नावे निष्पन्न होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.