सोलापूर : नीलकंठ बँकेच्या उपाध्यक्षा आणि सोलापूरातील सामाजिक कार्यकर्त्या पद्मा विठ्ठलदास भुतडा यांनी स्वहस्ताक्षरात लिहिलेले श्री रामचरित मानस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट म्हणून पाठवले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विजय झाला तर स्वहस्ताक्षरात श्री रामचरितमानस लिहिण्याचा संकल्प पद्मा भुतडा यांनी केला होता. हा संकल्प आता पूर्णत्वास गेला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०१९ साली देशभरात भारतीय जनता पक्षाचा विजय झाला. पद्मा भुतडा यांनी केलेल्या संकल्पाप्रमाणे यानंतर श्री रामचरितमानसच्या लिखाणास प्रारंभ केला. यात भुतडा यांनी श्री रामचरितमानस मधील संपूर्ण नऊ पारायणे आणि सात सोपान मोठ्या आकाराच्या वहीत स्वहस्ताक्षरात उतरवली आहेत. यात बालकांड, अयोध्या कांड, अरण्य कांड, किष्किंधा कांड, सुंदर कांड, लंका कांड आणि उत्तरकांडाचा समावेश आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकी वेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विजय मिळाल्यास श्री ज्ञानेश्वरी लिहिण्याचा संकल्प पद्मा भुतडा यांनी केला होता. त्यानुसार भुतडा यांचे श्री ज्ञानेश्वरीचे स्वहस्ताक्षरातील लिखाण देखील सुरू आहे. श्री ज्ञानेश्वरीची ही प्रत देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्याची भुतडा यांची मनीषा असून त्याकरिता पद्मा भुतडा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून भेटीची वेळ देखील मागितली आहे. सोमवारी पद्मा भूतडा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वहस्ताक्षरातील श्री रामचरितमानसची प्रत पाठवली. याप्रसंगी विठ्ठलदास भुतडा, नगरसेवक श्रीनिवास दायमा उपस्थित होते.





















