सोलापूर : सोलापूर शहरात श्रुती मंदिर सोलापूरच्या वतीने गुरुवर्य स्व. पद्माकर देव यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘स्मृती गौरव पुरस्कार’ प्रदान सोहळ्यात कोल्हापूर येथील तरुण गुणी कलाकार अर्हन मिठारी याला सन्मानित करण्यात आले. अवघ्या एकवीस वर्षांचा असलेला अर्हन मिठारी हा २१ विविध वाद्ये वाजवतो, ज्यात अनेक परदेशी वाद्यांचा समावेश आहे. त्याचा सप्रयोग सादरीकरण आणि मुलाखत या सोहळ्याचे खास आकर्षण ठरले.
शनिवारी सायंकाळी ६ वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात हा पुरस्कार प्रदान समारंभ पार पडला. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तबलावादक पंडित आनंद बदामीकर आणि शास्त्रीय गायिका प्रा. सुलभा पिशवीकर यांच्या हस्ते अर्हनला ‘स्मृती गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
पुरस्कार प्रदान करताना अर्हन मिठारीच्या कलागुणांचे कौतुक करताना पंडित आनंद बदामीकर म्हणाले, “आजच्या पिढीतील कलाकारांमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने आणि त्यातही परदेशी वाद्यांवर प्रभुत्व मिळवणारा अर्हन हा एक विस्मयकारक कलावंत आहे. २१ वाद्ये वाजवणे ही केवळ त्याची मेहनत नाही, तर संगीताप्रती असलेली त्याची निष्ठा आणि तीव्र ओढ दर्शवते. त्याच्या हातात जादू आहे आणि त्याचे भविष्य उज्ज्वल आहे. त्याने आपल्या कलेच्या माध्यमातून भारताचे नाव जगभर रोशन करावे, अशा माझ्या शुभेच्छा आहेत.” तर, शास्त्रीय गायिका प्रा. सुलभा पिशवीकर यांनी आपल्या भाषणात अर्हनचे कौतुक करताना सांगितले, “अर्हन मिठारी केवळ वाद्ये वाजवत नाही, तर तो त्या वाद्यांमधून भावना आणि आत्मा व्यक्त करतो. २१ वाद्यांमधील वैविध्य जपत त्याने प्रत्येक वाद्याचा बाज आत्मसात केला आहे. त्याची ही प्रतिभा तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे. भारतीय संगीताचा आणि इतर जागतिक संगीताचा संगम त्याच्या कलेतून दिसतो, जो अत्यंत आनंददायी आहे. श्रुती मंदिर संस्थेने अशा गुणी कलावंताला सन्मानित करून स्तुत्य कार्य केले आहे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत संस्थेचे अध्यक्ष अँड. जे. जे. कुलकर्णी यांनी केले. त्यानंतर अँड. कुलकर्णी आणि कार्यवाह विद्या काळे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेयस देशपांडे यांनी केले, तर समृद्धी शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. आशिष मिठारी, पुष्पा आगरकर, विद्या लिमये, पद्माकर कुलकर्णी, मोहन सोहनी, सुधीर देव, सुहास मार्डीकर, प्रशांत देशपांडे, अमोल धाबळे यांच्यासह संगीत रसिक उपस्थित होते.