पंढरपूर येथील उपनगरात असलेला नगरपालिकेचा ब्रिटिशकालीन तलाव तब्बल १५ वर्षांनंतर प्रथमच तुडुंब भरला आहे. तलाव तुडुंब भरल्याने परिसरातील विंधन विहिरींच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. पहिल्याच पावसाने तलाव ओसंडून वाहत असल्याने येथे विविध पक्षी चाऱ्याच्या शोधासाठी दाखल झाले आहेत. दरम्यान, पालिकेने तलावामध्ये नवीन इमारत बांधकामांना परवानगी दिल्याने भविष्यात या तलावाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.शहरातील नागालँडच्या मागे असलेल्या व पद्मनाम मंगल कार्यालयाच्या समोर नगरपालिकेच्या मालकीचा ऐतिहासिक तलाव आहे. हा तलाव शहराच्या सौंदर्यात भर घालणारा आहे. दरवर्षी हिवाळा व पावसाळ्यात येथे विविध जातींचे पक्षी मोठ्या संख्येने येतात. अलीकडच्या काही वर्षांमध्ये पाऊस कमी झाल्याने मागील काही वर्षांपासून हा तलाव कोरडा पडला होता.
तलाव कोरडा पडल्याने या भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. दरम्यान, यावर्षी तब्बल १५ वर्षांनंतर तलाव तुडुंब भरला आहे. तलाव भरल्याने नागालँड, वांगीकर नगर या भागातील विंधन विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पाणीटंचाई कमी झाली आहे.
दरम्यान, या तलावामध्ये नगरपालिकेने नवीन इमारत बांधकामांना परवानगी दिली आहे. त्यामुळे ऐतिहासिक तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पहिल्याच पावसाने तलाव ओव्हरफ्लो झाल्याने अनेक निर्माणाधीन घरांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे इमारतींची कामे ठप्प झाली आहेत.