सांगोला – शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजचा पालक मेळावा संपन्न झाला. यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड व उपाध्यक्ष महादेव गायकवाड, सचिव अंकुश गायकवाड उपस्थित होते. प्रारंभी पालक प्रतिनिधी विश्वनाथ भोसले यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.
प्रास्ताविकात प्राचार्य डॉ.रणजीत देशमुख यांनी विद्यार्थ्यांसाठी राबविलेले विविध उपक्रम, सराव परीक्षा, रात्र अभ्यासिका, दत्तक पालक योजनेचे कार्य याविषयी माहिती देऊन महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांनी घेतलेल्या हिवाळी परीक्षा २०२५ च्या निकालाचे वाचन केले. याप्रसंगी पालक प्रतिनिधी विश्वनाथ भोसले, उमेश देशमुखे यांनी मनोगतात विद्यार्थी या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिकत असताना उत्तम संस्काराची शिदोरी, कठोर मेहनत, शिस्त, प्रयत्नवादी बनून भविष्यासाठी उत्तम नागरिक म्हणून तयार होतात असे सांगितले.
बाबुराव गायकवाड यांनी पालकांनी केलेल्या सूचनांची दखल घेऊन त्या पूर्तता करण्याचे आश्वासन दिले. यावेळी उपस्थित पालकांनी पालक मेळाव्यानंतर आपल्या पाल्याच्या दत्तक-पालक शिक्षकाची भेट घेऊन त्यांची प्रगती जाणून घेतली. सदर पालक मेळावा यशस्वी करण्यासाठी प्राचार्य, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संदीप बावचे यांनी केले.

























