धाराशिव : देशभरात घरगुती गॅसची भीषण टंचाई निर्माण तर झालीच परंतु महाराष्ट्रात तर सरकारच्या जनहितविरोधी धोरणामुळे व नाकर्तेपणामुळे प्रचंड गॅस तुटवडा निर्माण झाला आहे. गॅस सिलेंडर अभावी त्रस्त महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला पुन्हा लॉकडाऊन असल्यासारखी भीती वाटत असल्याची टीका समाजवादी नेते ॲड रेवण भोसले यांनी केली आहे.
केंद्र सरकारने अमेरिकेसमोर गुडघे टेकल्यामुळे इराणकडून होणारा कच्च्या तेलाचा व गॅसचा पुरवठा खंडित झाला असून याचा मोठा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. एलपीजी गॅसच्या दरात 60 रुपयांनी वाढ करून केंद्र सरकारने सर्वसामान्यांना महागाईच्या गरतेत लोटले आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ही टंचाई निर्माण झाली असून सरकार युद्धाचे कारण पुढे करून जनतेची लूट करत आहे.
देशातील कोट्यवधी कुटुंबाच्या घरात स्वयंपाकासाठी गॅसची टंचाई केवळ केंद्र सरकारच्या नियोजनशून्य धोरणामुळे झाली आहे .एकीकडे महाराष्ट्रात तर मुख्यमंत्र्यासह सर्वच मंत्री राणा भीमदेवी थाटात गॅसची टंचाई निर्माण झाली नसल्याच्या थापा मारत आहेत तर दुसरीकडे गॅस एजन्सी बाहेर नोटाबंदीप्रमाणे लांबच लांब रांगा लागल्याचे दिसत आहे.
स्वयंपाकाच्या गॅसच्या तुटवड्यामुळे महाराष्ट्रात तर दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे. इंधन व एलपीजीची साठेबाजी होत असल्यामुळे गरीब आणि वंचित घटकांच्या स्वयंपाक घरात गॅसचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असताना महाराष्ट्र सरकार केवळ बघ्याची भूमिका घेऊन महागाईच्या आगीत तेल ओतण्याचे काम करत आहे.
महाराष्ट्राचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे पूर्णपणे धिंडवडे निघाले असून मुख्यमंत्र्यांचे कोणावरही नियंत्रण राहिलेले नाही, त्यामुळे आता महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांना सुरळीत गॅस पुरवठा न झाल्यास सर्वसामान्य व गोरगरीब जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादनही ॲड भोसले यांनी केले आहे.

























