पंढरपूर – येथील हॉटेल रानवारा येथे पंढरपूर तालुका पुलिसांनी रंगपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर कारवाई करीत सुमारे ८ हजार रुपयाचा अवैध दारू जप्त केल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांनी दिली.
या कारवाई संदर्भात माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुजावर यांनी सांगितले की, तालुका पोलीस ठाणे हद्दीतील आगामी रंगपंचमी या उत्सवाच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे तावशी- तनाळी रोडवरील येथील रानवारा हॉटेल तसेच गुरसाळे, देगाव आणि कासेगाव या गावात पंढरपूर तालुका पोलिसांनी रेड करून एकूण ८ हजार २१० (आठ हजार दोनशे दहा) रुपयांची अवैध दारू जप्त केलेली असून त्याबाबत पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे मुंबई दारूबंदी कायदा कलम ६५ प्रमाणे आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
सदरची कारवाई येथील उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनची वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस हवालदार साळुंखे, गावडे, बाजीराव काकडे, संजय गुटाळ, सतीश चंदनशिवे, तात्यासाहेब गायकवाड, परशुराम शिंदे यांच्या पथकाने केली.

























