तभा फ्लॅश न्यूज/सोलापूर ; राज्यातील 156 पोलीस निरीक्षकांना सहायक पोलीस आयुक्त व पोलीस उपअधीक्षक पदावर बढतीचा आदेश राज्याचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी काढला आहे.
यामध्ये सोलापूर शहरातील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांची नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अपर पोलीस अधीक्षक म्हणून पदोन्नती झाली आहे. तर यापूर्वी ग्रामीण पोलीस दलात पोलीस निरीक्षक म्हणून काम केलेले विजय कुंभार हे सोलापूर शहरात सहायक पोलीस आयुक्त म्हणून, शिरीष हुंबे व मच्छिंद्र पंडित हे ग्रामीण पोलीस दलात पोलीस उपअधीक्षक म्हणून येत आहेत. तसेच रवींद्र गायकवाड यांची सोलापूर लोहमार्ग पोलीस दलात पोलीस उपअधीक्षक म्हणून बढती झाली आहे. सोलापूर शहरात काम केलेले संजय पवार यांची बृहन्मुंबई येथे सहाय्यक पोलीस आयुक्तपदी व अश्विनी भोसले यांची धाराशिव येथे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपअधीक्षक पदी बढती झाली आहे.
शहर व ग्रामीण पोलीस दलात यापूर्वी पोलीस निरीक्षक म्हणून काम केलेले सुहास जगताप यांची नागपूर येथे सहायक पोलीस आयुक्तपदी तर अरुण फुगे हे गुन्हे अन्वेषण पुणे येथे पोलीस उपअधीक्षकपदी जात आहेत.