टेंभुर्णी – मोडनिंब (ता. माढा) येथील स्वरांजली कला केंद्रात सुरू असलेले अनैतिक वेश्या व्यवसायाचे रॅकेट टेंभुर्णी पोलिसांनी उघडकीस आणले. प्रभारी अधिकारी राहुल आत्राम (परिविक्षाधीन भा.पो.से.) यांच्या नेतृत्वाखाली टाकलेल्या छाप्यात एका महिलेसह पाच आरोपींना अटक करण्यात आली असून २५ महिलांची सुटका करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, टेंभुर्णी शहरातील जंजिरा हॉटेल व लॉजवर दोन महिन्यांपूर्वी करण्यात आलेल्या कारवाईनंतर टेंभुर्णी पोलिसांची ही दुसरी मोठी कारवाई मानली जात आहे. त्यामुळे परिसरातील अशा प्रकारच्या गैरप्रकारांविरोधात पोलिसांनी मोहीमच उघडल्याची चर्चा सुरू आहे.
टेंभुर्णी पोलीस ठाण्याला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की मोडनिंब येथील स्वरांजली कला केंद्रात परराज्य व परजिल्ह्यातील महिलांना आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत कुंटणखाना चालविला जात आहे. या माहितीच्या आधारे प्रभारी अधिकारी राहुल आत्राम यांनी पोलीस कर्मचारी, पंच व डमी ग्राहक यांच्या मदतीने नियोजनबद्ध सापळा रचत पहाटे छापा टाकला.
या कारवाईत कला केंद्राचे मालक जगन्नाथ तुकाराम घाडगे (रा. अरण, ता. माढा), कला केंद्र चालक विशाल लता पवार (वय २४, रा. जामखेड, ता. अहिल्यानगर), व्यवस्थापक बाळासाहेब गोविंद गिड्डे (वय ६३, रा. अरण, ता. माढा), पार्टी मालकीन छाया बाळासाहेब सुरवसे (वय ३५, रा. आंबेजोगाई, जि. बीड), रिक्षा चालक नितीन चांगदेव चव्हाण (वय ४९, रा. मोडनिंब, ता. माढा) व स्वागत लॉज व्यवस्थापक सिद्धांत सुखदेव गायकवाड (वय ३३, रा. मोडनिंब, ता. माढा) यांचा सहभाग असल्याचे समोर आले.
छाप्यात एकूण २५ महिलांची सुटका करण्यात आली. त्यापैकी एका ३८ वर्षीय पश्चिम बंगाल येथील पीडित महिलेच्या जबाबावरून आरोपी आर्थिक फायद्यासाठी परराज्य व परजिल्ह्यातील महिलांना आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल सहदेव देवकर यांच्या फिर्यादीवरून टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४९/२०२६ अन्वये अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६ चे कलम ३, ४, ५, ६ तसेच भारतीय न्याय संहिता कलम १४३(२), १४३(३), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींना माढा येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सुटका करण्यात आलेल्या महिलांना न्यायालयाच्या आदेशानुसार सोलापूर येथील महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर व करमाळा उपविभागाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. तपास प्रभारी अधिकारी राहुल आत्राम करीत आहेत.
दरम्यान, माढा तालुक्यातील मोडनिंब व टेंभुर्णी पोलीस ठाणे हद्दीतील काही कला केंद्रे तसेच राष्ट्रीय महामार्गावरील काही लॉजमध्ये बराच काळ परराज्यातील, विशेषतः बंगालमधील महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे. काही एजंटमार्फत महिलांना विविध लॉजवर ग्राहकांपर्यंत चारचाकी वाहनातून पोहोचवले जात असल्याची माहितीही समोर येत आहे. तसेच टेंभुर्णी शहरातील एका गल्लीमध्ये काही महिला याचे एजंट असून त्यांच्यामार्फत अल्पवयीन मुलींना ही पाठवले जात असल्याचे चर्चा आहे कोणी यांच्याकडे चौकशीला गेले तर ते अनाथ आहे आम्ही अनाथांना संभाळ करतोय असे सांगून प्रशासनाची दिशाभूल करत असल्याचे समजते
टेंभुर्णी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगत काही ठिकाणी खुलेआम अशा प्रकारचे गैरप्रकार सुरू असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे अशा प्रकारांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणीही सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.























