शिवसेना आमदारांचा निकाल ज्यांच्या हाती आहे, ते महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर स्वतःच काही वर्ष शिवसेनेत होते.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाबाबत महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज दुपारी निकाल जाहीर करणार आहेत. या बहुप्रतीक्षित निकालाकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे सहकारी आमदार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या आमदारांचे भवितव्य अवलंबून आहे. विशेष म्हणजे शिवसेना आमदारांचा निकाल ज्यांच्या हाती आहे, ते राहुल नार्वेकर स्वतःच काही वर्ष शिवसेनेत होते.
राहुल नार्वेकर कोण आहेत?
राहुल नार्वेकर जवळपास १५ वर्ष शिवसेनेत होते, परंतु २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यावेळी शिवसेनेचे प्रवक्तेपद सांभाळणारे आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे राहुल नार्वेकर यांनी अचानक पक्ष सोडल्याने मोठा भूकंप झाला होता.
राष्ट्रवादीत प्रवेश करताच (२०१४) जितेंद्र आव्हाड यांनी राहुल नार्वेकरांना मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीचं तिकीट जाहीर केलं. मात्र त्यांना शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंकडून पराभवाचा सामना करावा लागला. नार्वेकर यांची जून २०१६ मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर राज्यपालांचे नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड झाली होती.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर नार्वेकरांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला. आणि भारतीय जनता पक्षाचा झेंडा खांद्यावर धरला. आता भाजपच्या तिकीटावर मुंबईतील कुलाबा विधानसभा मतदारसंघातून ते विद्यमान आमदार आहेत. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येताच त्यांच्या खांद्यावर विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. नार्वेकर देशातील सर्वात युवा विधानसभा अध्यक्ष ठरल्याचं फडणवीसांनी त्यावेळी सांगितलं होतं.
राहुल नार्वेकर हे राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत. राहुल यांचे वडील सुरेश नार्वेकर कुलाबा भागातील नगरसेवक होते. तर भाऊ मकरंद नार्वेकर प्रभाग क्रमांक २२७ मधून दुसऱ्यांदा नगरसेवक आहेत. राहुल यांची वहिनी हर्षिता नार्वेकर या प्रभाग क्रमांक २२६ मधून नगरसेविका आहेत.