मुंबई – कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपा – शिवसेना शिंदे गटामध्ये सत्ता स्थापनेसाठी चढाओढ सुरु असताना आपले चार नगरसेवक बेपत्ता झालेल्याने संतप्त झालेल्या शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याबद्दल तक्रार देण्यात आली असून ते हरविले आहेत, असे पोस्टर शहरात ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.
निवडणूक निकालानंतर नगरसेवकांच्या पळवापळवीच्या संशयाने राजकीय वातावरण तापले आहे. ठाकरे गटाचे ११ उमेदवार निवडणुकीत विजयी झाले मात्र त्यापैकी चार नगरसेवक १६ जानेवारीपासून बेपत्ता आहेत. मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणे, राहुल कोट आणि स्वप्नील केणे यांचा समावेश आहे. अशी त्यांची नावे असून त्यांना शिंदे गटाने फोडून अज्ञातस्थळी पाठवले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.त्यामुळे कल्याण पूर्व परिसरात या नगरसेवकांचे “हरवले आहेत” अशा आशयाचे पोस्टर झळकवण्यात आले आहेत.
महापालिकेत आपला महापौर बसवण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असताना ठाकरे गटाचे चार शिलेदार अचानक गायब झाले.त्यांच्याशी कोणताही संपर्क होत नसल्याने अखेर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी कोळशेवाडी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. मात्र, “तक्रार देऊनही पोलिस प्रशासन सुस्त असून, नगरसेवकांचा शोध घेण्यास टाळाटाळ केली जात आहे,” असा गंभीर आरोप पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी केला आहे.
याबाबत खा. संजय राऊत यांनी “आमच्या नगरसेवकांना दबावाखाली किंवा प्रलोभनाखाली पळवून नेले जात असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. पोलिसांनी तातडीने त्यांचा शोध घ्यावा, अन्यथा आम्हाला शिवसेना स्टाईलने कारवाई करावी लागेल.” असा इशारा दिल्यानंतर आज कल्याण पूर्व भागात ठाकरे गटाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. बेपत्ता नगरसेवकांचे फोटो असलेले पोस्टर ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. “कुणालाही हे नगरसेवक आढळून आल्यास शिवसेना शाखेशी संपर्क साधावा,” असे आवाहन या पोस्टर्सच्या माध्यमातून करण्यात आले आहे. या अनोख्या आंदोलनामुळे नागरिकांमध्येही मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
———
कुटुंबीयामध्ये अस्वस्थता
राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच, दुसरीकडे या 4 नगरसेवकांचे कुटुंबीय आणि नातेवाईकही चिंतेत आहेत.त्यांचा जीव धोक्यात असल्याची भीती त्यांच्याकडून व्यक्त होत असून, पोलिसांनी तातडीने तपास करण्याची मागणी केली जात आहे. सत्तास्थापनेच्या खेळात या नगरसेवकांचे नक्की काय झाले? ते स्वतःहून बाहेर गेले आहेत की त्यांना अज्ञातस्थळी नेण्यात आले आहे? या राजकीय ‘बेपत्ता’ नाट्याचा शेवट कसा होतो आणि ते कधी प्रकट होतात?, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.


























