पंढरपूर – श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिसरातील परिवार देवता मंदिरांचे जतन व संवर्धन काम पुरातत्व विभागामार्फत शासन निधीतून सुरू आहे. या अंतर्गत श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिरातील एकूण ३६ परिवार देवतांपैकी काही मंदिरांचे जतन व संवर्धन कार्य पूर्णत्वास आले असून, त्यातील १० मंदिरांमधील परिवार देवतांच्या मूर्तींची विधिवत प्राणप्रतिष्ठा शुक्रवारी ( दि.६ ) संपन्न झाली.
दक्षिणमुखी गणपती मंदिर, गरुड हनुमंत, श्री रामेश्वर मंदिरावरील शाळुंखा या परिवार देवतांच्या मूर्ती नव्याने विधिवत यज्ञ करून स्थापित करण्यात आल्या. तसेच महा नैवेद्य दरवाज्याशेजारील शाकंबरी, काशीविश्वेश्वर शेजारील गणपती, काशी विश्वेश्वर, काशी विश्वेश्वर समोरील नंदी, रामेश्वर, रामेश्वर समोरील नंदी, लक्ष चौऱ्याऐंशी देवी आदी परिवार देवतांच्या मूर्तींची पुनः प्राणप्रतिष्ठा शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आली.
हा प्राणप्रतिष्ठा सोहळा दिनांक ४ ते ६ फेब्रुवारी या कालावधीत श्री विठ्ठल सभा मंडप येथे २१ ब्रह्मवृंदा मार्फत पार पडला. यावेळी मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य शकुंतलाताई नडगिरे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगावकर), कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, लेखाधिकारी मुकेश अनेचा, विभाग प्रमुख संजय कोकीळ, अतुल बक्षी, सहाय्यक विभाग प्रमुख संदीप कुलकर्णी व प्रसाद दशपुत्रे उपस्थित होते.
या दहा परिवार देवता मंदिरांचे जतन व संवर्धन कार्य पूर्णत्वास आल्याने संबंधित मंदिरांतील मूर्तींची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली असून, ही मंदिरे आता भाविकांच्या दर्शनासाठी खुली करण्यात येत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर अंतर्गत शासना मार्फत मंदिराच्या मुख्य वास्तूंसह मंदिर परिसरातील व बाहेरील परिवार देवता भागातील विविध ठिकाणांचे जतन, दुरुस्ती व संवर्धन कार्य टप्प्याटप्प्याने हाती घेण्यात आले आहे. यापैकी काही ठिकाणची कामे यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत. जतन व संवर्धन कार्य पूर्ण झालेल्या ठिकाणी स्थापत्य व धार्मिक परंपरेनुसार मूर्तींची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करणे आवश्यक असते. धार्मिक शास्त्र, प्रचलित रीतिरिवाज व परंपरांनुसार प्राणप्रतिष्ठा झाल्याशिवाय मूर्तींच्या पूजनास प्रारंभ करता येत नाही. त्या अनुषंगाने दिनांक ४ ते ६ फेब्रुवारी या तीन दिवसांच्या कालावधीत सर्व संबंधित मूर्तींची प्राणप्रतिष्ठा शास्त्रोक्त पद्धतीने, विधिवत पूजा, अभिषेक, होम–हवन, मंत्रोच्चार व इतर धार्मिक विधींसह भक्तिभावात संपन्न करण्यात आली.
















