सोलापूर : येथील संगमेश्वर महाविद्यालयातील भूगोल विभागाचे प्रा. डॉ. शिवाजी मस्के यांनी विकसित केलेल्या टॅबलेट आधारित पोर्टेबल भौगोलिक सर्वेक्षण उपकरणास युनायटेड किंगडम देशाकडून पेटंट मंजूर झाले आहे. आंतरराष्ट्रीय यश संपादन करून त्यांनी सोलापूरच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे.
डॉ. मस्के यांनी विकसित केलेली ही प्रणाली पूर्णपणे डिजिटल व टॅबलेट-आधारित असून भौगोलिक सर्वेक्षणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करते. स्थान निर्धारण, डेटा संकलन, साठवण प्रक्रिया आणि संप्रेषण तंत्रज्ञान यांचा एकत्रित वापर या उपकरणात करण्यात आला आहे. क्षेत्रीय काम करताना प्रत्यक्ष वेळेत भूसंदर्भित माहिती संकलित करण्याची क्षमता या प्रणालीत आहे. त्यामुळे सर्वेक्षण करताना स्थान, फोटो, मोजमाप व आवश्यक नोंदी अचूकपणे करते. डॉ. मस्के यांचे हे उपकरण स्थानिक पातळीवर डिजिटल सर्वेक्षण अधिक सक्षम करण्यास उपयुक्त ठरणार आहे.
Portable Geographic Survey Assistant Device (PGSAD) ही एक हाताळण्याजोगी किंवा टॅबलेटआधारित डिजिटल प्रणाली आहे. जी क्षेत्रीय भौगोलिक सर्वेक्षणासाठी वापरली जाते. यात स्थाननिर्धारण, डेटा संकलन, साठवण, प्रक्रिया आणि संप्रेषण तंत्रज्ञानाचा समावेश असतो. भूगोलतज्ज्ञ, नियोजक, अभियंते आणि संशोधकांना क्षेत्रातून अचूक स्थानिक व गुणात्मक माहिती गोळा करण्यास ही प्रणाली मदत करते. याचा मुख्य उद्देश कागदाधारित सर्वेक्षण पद्धतीची जागा घेणे आणि क्षेत्रीय कामानंतर होणाऱ्या डेटा नोंदणीतील त्रुटी कमी करणे हा आहे. ही प्रणाली प्रत्यक्ष वेळेत भू-संदर्भित माहिती संकलित करते, ज्यामुळे प्रत्येक निरीक्षण (स्थान, फोटो, मोजमाप, नोंद) अचूक समन्वयांकांशी जोडले जाते. भूगोल व पर्यावरण अभ्यास, शहरी व प्रादेशिक नियोजन – पायाभूत सुविधा नकाशांकन,रस्ते, वीज, नाले सर्वेक्षण, स्मार्ट सिटी डेटा संकलन, शेती, आपत्ती व्यवस्थापन,पूर व चक्रीवादळ नुकसान मूल्यांकन,भूस्खलन व भूकंप सर्वेक्षण, आपत्कालीन संसाधन नकाशांकन, जनगणना व सामाजिक-आर्थिक सर्वेक्षण यासाठी हे उपयोगी राहणार आहे. विविध स्तरांतून डॉ. मस्के यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




















