जेऊर – राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त जिजाऊ सृष्टी येथे मराठा सेवा संघाच्या वतीने दरवर्षी दिले जाणारे विविध प्रतिष्ठेचे पुरस्कार शुक्रवारी (दि. ८) रोजी जाहीर करण्यात आले आहेत. समाजजीवनातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना हे पुरस्कार सोमवार दि. १२ जानेवारी २०२६ रोजी जिजाऊ जयंतीदिनी सिंदखेडराजा येथे प्रदान करण्यात येणार आहेत.
यंदाचा ‘मराठा शिक्षणभूषण पुरस्कार’ हा प्रा. रामदास मधुकर झोळ यांना जाहीर करण्यात आला आहे. शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन मानून जिजाऊ-शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे कार्य त्यांनी शिक्षणक्षेत्रात केले आहे. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या शैक्षणिक समित्यांवर अत्यंत उल्लेखनीय कार्य केलेले आहे. सोलापूर (वाशिंबे) येथून त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात करत शिक्षणप्रसारासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने मास्टर इन कम्प्युटर अँप्लीकेशन (एमसीए) या अभ्यासक्रमाची कालमर्यादा ३ वर्षाऐवजी २ वर्षे करणे, शिष्यवृत्ती सवलतीमध्ये अधिकाधिक अभ्यासक्रमांचा समावेश करून घेणे, वसतिगृह भत्ताच्या रक्कमेमध्ये वाढ करून घेणे, मा. खा. शरदचंद्रजी पवार व मा. चंद्रकांतजी पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करुन ईडब्ल्युएस प्रवर्गातुन अतिरिक्त प्रवेशाच्या जागा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करुन त्या अतिरिक्त प्रवेशाच्या जागा तयार करुन घेतल्या, अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र या अभ्यासक्रमांची प्रवेशपात्रता संबंधित शिखरसंस्थांच्या पात्रतेप्रमाणे करणे, ईडब्ल्युएस च्या प्रथम वर्षाच्या रिक्त जागा दुसऱ्या वर्षाच्या लॅटरल एन्ट्रीमध्ये उपलब्ध करुन देणे अशा विविध बदलांचा समावेश आहे. ज्यामुळे महाराष्ट्र राज्यातील विद्याथ्यांना त्याचा मोठा फायदा झालेला आहे. यापुर्वी सदरचा पुरस्कार हा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना प्राप्त झालेला आहे.
तसेच ‘मराठा विश्वभूषण पुरस्कार’ पुणे येथील कैलास साहेबराव काटकर यांना सायबर सुरक्षा आणि सायबर साक्षरता या क्षेत्रात केलेल्या व्यापक, प्रभावी व समाजोपयोगी कार्याची दखल घेत जाहीर करण्यात आला आहे. ‘जिजाऊ पुरस्कार’ हा गंगा संभाजीराव कदम यांनी भारतीय अंध महिला टी-२० क्रिकेट संघाच्या उपकर्णधार म्हणून त्यांनी संघाला विश्वचषक विजयापर्यंत नेले. याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
‘मराठा कृषिभूषण पुरस्कार’ शिवश्री अमृतराव दादाराव देशमुख यांना शेती क्षेत्रात संशोधन, प्रयोगशीलता आणि नवकल्पनांच्या माध्यमातून केलेल्या कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे तर दृष्टीबाधित असतानाही जलतरण व क्रीडा क्षेत्रात राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ‘मराठा क्रीडाभूषण पुरस्कार’ रितेश राजेंद्र केरे यांना जाहीर करण्यात आला आहे.
जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीदिनी हे सर्व पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत जिजाऊ सृष्टी येथे प्रदान करण्यात येणार असून, या पुरस्कारांमुळे समाजात कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याला प्रेरणा मिळेल, असा विश्वास मराठा सेवा संघाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.





















