पंढरपूर – युध्दजन्य परिस्थितीमुळे सध्या येथील स्विटस्, बेकर्स अॅड हॉटेल्स व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे येथील व्यवसायिकांना कमर्शियल गॅस पुरवठा करण्याबाबतचे निवेदन येथील श्री विठ्ठल स्विटस्, बेकर्स अॅड हॉटेल्स असोसिएशनच्या वतीने सोमवारी (ता.१६) तहसीलदारांना देण्यात आल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अमोल गंगाखेडकर यांनी दिली.
दरम्यान या निवेदनातील मागणी संदर्भात माहिती देताना असोसिएशनचे अध्यक्ष गंगाखेडकर यांनी सांगितले की, पंढरपूर ही महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी असून अनेक भाविक श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी श्री क्षेत्र पंढरपूर येथे असतात. त्यांची गैरसोय होऊ नये व आमचा हॉटेल्स, स्विटस् व बेकरीचा उद्योग बंद होऊ नये. (असोशिएनमधील ३० फर्मला महिन्याला १२०० कमर्शियल सिलेंडर लागत असून त्यापैकी कमीत-कमी ७०० सिलेंडरची तरतूद करावी, ही विनंती) आमच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी शासनाकडून नियमानुसार आम्हाला कमर्शियल गॅसचा पुरवठा करावा.
पंढरपूरातील ३० हॉटेल, बेकर्स, स्विटस् यांची पुर्ण नियमाने चालणारी (अन्नभेसळ, कमर्शियल गॅस, शॉप अॅक्ट टॅक्स रिटर्न) ही सर्व कागदपत्रे उपलब्ध असून नियमाप्रमाणे चालणारी असोसिएशन असून कृपया आम्हाला कमर्शियल गॅस उपलब्ध व्हावेत अशी विनंती देखील असोसिएसनच्या वतीने तहसीलदारांना करण्यात आलेली आहे.
दरम्यान असोसिएशनचे अध्यक्ष अमोल गंगाखेडकर, उपाध्यक्ष सागर तारापुरकर यांच्या मार्गदर्शनाखालील असोसिएशनच्या ३० ते ४० सदस्यांनी येथील तहसीलदार सचिन लंगुटे यांची आज तहसील कार्यालयात भेट घेवून त्यांच्याशी चर्चा करुन शासनाकडे मागणी पाठविण्याची विनंती केली. त्या नंतर तहसिलदारांनी असोसिएशनच्या वतीने करण्यात आलेल्या मागणीचा निश्चित विचार केला जाईल असे आश्वासन दिल्याची माहिती देखील असोसिएशनचे अध्यक्ष अमोल गंगाखेडकर यांनी दिली.
























