मुदखेड – शहरातील महत्त्वाचे असलेल्या मुदखेड रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या पुनर्विकास योजनेतील विकास कामांच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या कामांमध्ये निकृष्ट दर्जाचा वापर होत असल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव ठाकरे गटा चे माजी शहर प्रमुख अंकुश मामिडवार यांनी नांदेड येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली आहे.
मुदखेड रेल्वे स्थानक हे मराठवाड्यातील महत्त्वाचे जंक्शन मानले जाते. केंद्र सरकारच्या पुनर्विकास योजनेअंतर्गत येथे विविध विकासकामे सुरू आहेत. मात्र प्रत्यक्षात सुरू असलेल्या कामांमध्ये दर्जाहीन साहित्य वापरले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे भविष्यात प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी चिंता स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
या संदर्भात अंकुश मामिडवार यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ व इतर भागांवर सुरू असलेल्या कामांमध्ये तांत्रिक निकषांचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी आणि अभियंत्यांनी कामांची सखोल तपासणी करून दोषी ठेकेदारावर कारवाई करावी, तसेच निकृष्ट दर्जाचे काम तात्काळ थांबवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही जर कामांचा दर्जा निकृष्ट असेल तर तो जनतेच्या पैशांचा अपव्यय ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित ठेकेदाराचे नोंदणी रद्द करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, या तक्रारीमुळे मुदखेड रेल्वे स्थानकावरील सुरू असलेल्या विकासकामांबाबत प्रशासन काय भूमिका घेते याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.


























