तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : तब्बल दोन दशकांनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज मातोश्रीवर दाखल झाले. शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा होत असतानाच राज ठाकरेंनी त्यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. या ऐतिहासिक भेटीने ठाकरे बंधूंमधील दुरावा कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज ठाकरे शिवतीर्थवरून मातोश्रीकडे रवाना झाले दुपारी १२ वाजता मातोश्रीवर पोहोचले. त्यावेळी शिवसेना नेते संजय राऊत, अंबादास दानवे उपस्थित होते. मंचावर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना लाल गुलाबाचा पुष्पगुच्छ देत सदिच्छा दिल्या आणि दोघांनीही एकत्र फोटोसेशन केलं.
राज ठाकरे यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी काही वेळासाठी उपस्थित शिवसैनिकांना थांबण्याची विनंती केली आणि राज ठाकरेंना घरी घेऊन गेले. दोघांमध्ये अनौपचारिक चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे मनसे-शिवसेना युतीबाबतचे अंदाज आता अधिक बळकट होत आहेत.