बार्शी – चैत्र शुद्ध नवमीनिमित्त आज गुरुवार दि. २६ मार्च रोजी प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव बार्शी शहरात अत्यंत भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. श्री भगवंत मंदिर शेजारील श्रीराम मंदिरात दुपारी १२ वाजता श्रीराम जन्माचा सोहळा पार पडताच मंदिर परिसरात “राम जन्मला गं सखे, राम जन्मला!” आणि “कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम!” या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला.
श्रीराम मंदिर येथे फुलांनी सजविलेल्या पाळण्यात प्रभू श्रीरामांची छोटी मूर्ती ठेवून पूजाअर्चा करण्यात आली. महिलांनी पारंपरिक पद्धतीने पाळणा गात फुलांची व गुलालाची उधळण करत श्रीराम जन्मोत्सव साजरा केला.
प्रभू श्रीरामाच्या मुर्तीची शोभायात्रा
सायंकाळी ५ वाजता सकल हिंदू समाज, विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभू श्रीराम व श्रीहनुमान यांच्या मूर्तींची भव्य शोभायात्रा बार्शी शहरातून काढण्यात आली. या शोभायात्रेतील नऊ फुटांची प्रभू श्रीरामांची मूर्ती आणि सात फुटांची श्रीहनुमानाची मूर्ती हे विशेष आकर्षण ठरले.
शोभायात्रेची सुरुवात भगवंत मंदिर शेजारील श्रीराम मंदिरातून करण्यात आली. माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते मूर्तीचे पूजन करुन शोभायात्रेला प्रारंभ झाला. ही शोभायात्रा महाद्वार चौक, वीर सावरकर चौक, पटेल चौक, पानखुंट, ऐनापुर मारुती रोड, तेलगिरणी चौक, शिवाजी आखाडा, बस स्टॅन्ड चौक, पोस्ट चौक, सोमवार पेठ, पांडे चौक, नगरपरिषद, श्री भगवंत मंदीर, तानाजी चौक, बेदराई गल्ली, हांडे गल्ली, एकविराई चौक आदी प्रमुख मार्गांवरुन जात पुन्हा भगवंत मंदिर येथे विसर्जित करण्यात आली.
शोभायात्रेदरम्यान पारंपरिक वाद्यांचे सूर, प्रभू श्रीरामाच्या जयघोषामुळे संपूर्ण शहरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले. रस्त्याच्या दुतर्फा शिस्तबद्ध रांगा करुन भाविकांनी या यात्रेत सहभाग नोंदविला. अनेक ठिकाणी फुलांची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करुन यात्रेचे स्वागत करण्यात आले.
मागील पाच वर्षांपासून अखंडपणे आयोजित करण्यात येणारी ही शोभायात्रा बार्शीकरांसाठी आकर्षणाचा विषय ठरत असून, यावर्षीही मोठ्या संख्येने लहान मुले, तरुणाई आणि महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या.
ही शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे बापूसाहेब कदम, अमर शुक्ला, शिरीष अण्णा जाधव, बिट्टू बारंगुळे, दीपक ढगे आदी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.



























