मुदखेड – रेशन दुकानदार ( परवाना धारक ) आणि काही व्यापारी मिळून गोरगरीब जनतेला मिळणारे मोफत रेशन काळ्या बाजारात तस्करी करीत आहेत. रेशन कार्ड धारकांना महिन्याकाठी दिला जाणारा तांदूळ हा त्यांच्या उदरनिर्वाहासाठी दिला जातो ‘ पण गरजेपोटी ते तांदूळ विक्री करतात आणि त्याचा फायदा रेशन माफिया घेतात.
मुदखेड तालुक्यात रेशन माफीयांच रॅकेट सक्रिय झालं आहे.रेशन दुकानातून मिळालेल्या धान्यांची अवैद्य विक्री शहरात मोट्या प्रमाणात चालू आहे.मोफत मिळालेलं धान्य पुन्हा काळ्या बाजारात विकण्याचा धक्कादायक प्रकार मुदखेड शहरात घडत आहे.
मोफत मिळालेल्या धान्यांची १० ते १५ रुपयाने खरेदी करून त्याची तस्करी केली जात आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गरिबांना ५ किलो गहू आणि ५ किलो तांदूळ मोफत देण्याचा निर्णय घेतला. पण मुदखेड मधील रेशन दुकानातून मिळणार धान्य पुन्हा बाजारात अवैध्य विक्रीला येत आहे.शिवाय रेशनच्या तांदळाची तस्करी काळ्या बाजारात करणार एक मोठं रॅकेट मुदखेड शहरात सक्रिय असल्याची माहिती आहे. गरिबांच्या मोफत राशनवर माफियांच्या नजरा टिकून असल्याच दिसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात रेशनच्या तांदुळाची तस्करी वाढली आहे. रेशनच्या तांदळाला काळ्या बाजारात चांगला दर मिळत असल्याने मुदखेड शहरात माफिया सक्रिय झाले असून यात लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. हा तांदूळ जातो तरी कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.तालुक्यात सर्वत्र तांदुळाची तस्करी सुरू असून गावोगावी तांदूळ खरेदी करण्यासाठी सदर तस्कर फिरत आहेत.कमी दराने तांदूळ खरेदी करून हा रेशनचा तांदूळ नंतर मोठ्या व्यापाऱ्यांना विकला जात आहे.
गोरगरीब जनतेला आर्थिक अमिषाला बळी पाडून तांदूळ तस्कर मोठी वरकमाई करीत असल्याच चित्र मुदखेडात सर्वत्र दिसून येत आहे. तसेच काही रेशन दुकानदार (परवाना धारक )सुद्धा हा व्यवसाय करत आहेत.

























