तभा फ्लॅश न्यूज/ बदनापूर : मांजरगाव येथे झालेल्या दोन गटांतील वादामुळे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. घटनेनंतर सोशल मीडियावर “धार्मिक स्थळावरून दोन समाजात वाद” अशी बातमी वाऱ्यासारखी पसरली. मात्र, ही माहिती पूर्णपणे चुकीची असून हा वाद फक्त दोन लहान शाळकरी मुलांच्या भांडणातून उफाळल्याचे पोलीस निरीक्षक मछिंद्र सुरवसे यांनी स्पष्ट केले आहे.
घटना कळताच बदनापूर पोलिसांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहताच जमलेला जमाव पळून गेला. या वेळी २० ते २५ मोटारसायकली घटनास्थळी सोडून दिल्याने त्या पोलिसांनी जप्त केल्या. दोन्ही गटांकडून तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, काही जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक सुरवसे म्हणाले,
धार्मिक वादाचा कुठलाही संबंध नाही. ही घटना दोन शाळकरी मुलांच्या भांडणातून घडली आहे. चुकीच्या बातम्या सोशल मीडियावर पसरवल्या जात आहेत. कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, कोणालाही वाचवले जाणार नाही. रात्री उशिरा हल्लेखोरांपैकी चार जण पोलिसांनी ताब्यात घेतले असून, उर्वरित आरोपींचा शोध व्हिडीओ फुटेजच्या आधारे सुरू आहे. यापूर्वी धार्मिक स्थळावरील भोंग्याचा वाद पोलीस निरीक्षक सुरवसे यांनी शांततेने मिटवला होता. विशेष म्हणजे, सोशल मीडियावरील अफवांना छेद देत पोलिसांनी गावात पुन्हा शांतता प्रस्थापित करण्यात यश मिळवले आहे.