टेंभुर्णी – पासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या करमाळा तालुक्यातील कंदर–सातोली येथील पारंपरिक शिवरस्ता तातडीने दुरुस्त करून द्यावा, अन्यथा ६ मार्च रोजी याच रस्त्यावर कुटुंबासह आत्मदहन करू, असा इशारा येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या लेखी निवेदनातून दिला आहे. या निवेदनामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कंदर–सातोली हा शिवरस्ता अनेक वर्षांपासून वापरात असून या मार्गावर शेतकऱ्यांच्या जमिनी, घरे तसेच शाळा आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून काही व्यक्तींनी या रस्त्यावर ये-जा करणाऱ्यांना अडवणूक करत ओढ्यातील पावसामुळे वाहून गेलेला रस्ता भरण्यास अडथळे निर्माण केले आहेत. तसेच पुढील भागातील रस्ता काही जणांनी अत्यंत अरुंद करून तो दुरुस्त होऊ नये यासाठी अडथळे आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. परिणामी हा रस्ता पूर्णपणे बंद पडल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
या संदर्भात २०२३ पासून प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही अद्याप पाहणी अथवा ठोस कारवाई झालेली नाही. रस्ता बंद झाल्यामुळे शेतमालाची ने-आण, विद्यार्थ्यांची शाळेत जाणे तसेच दैनंदिन व्यवहार यावर गंभीर परिणाम झाला असून आर्थिक व शैक्षणिक नुकसान सहन करावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
६ मार्चपर्यंत रस्ता दुरुस्त न झाल्यास शुक्रवारी (दि. ६) कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा नागनाथ चव्हाण, सिद्धेश्वर गोडसे, हनुमंत साळुंके, राजेंद्र जगताप, सचिन जाधव, दशरथ बारबोले, शिवाजी साळुंके, अजित फरताडे व संतोष पवार आदी शेतकऱ्यांनी दिला आहे.
दरम्यान, या प्रकरणाची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतल्याचे समजते. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्र्यांसह पोलीस अधीक्षक, प्रांताधिकारी, तहसीलदार व संबंधित पोलीस ठाण्यास देण्यात आल्या आहेत.


























