सोलापूर : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने सोलापूर शहर महाविकास आघाडीने पुढील पाच वर्षांसाठीचा दूरदृष्टीपूर्ण ‘शहर विकास जाहीरनामा – २०२६’ प्रसिद्ध आज केला. कामगार रिक्षा चालकासह सामान्यजनांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. शहराला एक दिवसाआड सुरळीत आणि आयटी पार्क उभारण्याचा संकल्प यामध्ये करण्यात आला. सोलापूर शहर विकास आराखड्याचे पुनर्विलोकन करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. महापालिकेतील प्रशासकीय राजवटीतील भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी खा. प्रणिती शिंदे. माकपचे माजी आ. नरसय्या आडम, माजी आ. प्रकाश यलगुलवार, शिवसेना (उबाठा) पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड, जिल्हाप्रमुख प्रा. अजय दासरी, प्रताप चव्हाण, दत्ता गणेशकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष महेश गादेकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, माकपचे युसूफ मेजर, प्रा. अशोक निम्बर्गी, ॲड. केशव इंगळे आदींसह पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाविकास आघाडीच्या या जाहीरनाम्यातून सोलापूर शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि पायाभूत विकासाचा सविस्तर आराखडा मतदारांसमोर ठेवण्यात आला. न्याय, विकास आणि समृद्धी या त्रिसूत्रीवर आधारित हा जाहीरनामा सोलापूरची बहुभाषिक, बहुसांस्कृतिक व धर्मनिरपेक्ष ओळख कायम राखत “शहर प्रथम” या भूमिकेतून तयार करण्यात आल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावेळी स्पष्ट केले.
जाहीरनाम्यात नियमित व मुबलक शुद्ध पाणीपुरवठा एक दिवसाआड करण्याचा संकल्प, घनकचरा व्यवस्थापनाचे सुसूत्रीकरण, प्रदूषणमुक्त व हरित सोलापूरसाठी ठोस उपाययोजना, आधुनिक रस्ते विकास आणि खड्डेमुक्त टिकाऊ रस्त्यांची निर्मिती, उद्याने व हिरव्या जागांचे संवर्धन, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आधुनिकीकरण तसेच सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा यांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.
महानगरपालिकेच्या शाळा अद्यावत करून त्यांचा दर्जा उंचावणे, मराठी शाळांसाठी विशेष निधी उपलब्ध करणे, शहरात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणे, ड्रेनेज व जलवाहिन्यांचे विस्तारीकरण, पार्किंग व सार्वजनिक स्वच्छतागृहांची उभारणी, करप्रणालीत सुसूत्रीकरण आणि विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व आयटी पार्कच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती अशा अनेक भविष्यमुखी योजनाही जाहीरनाम्यात समाविष्ट आहेत.
महिला, विद्यार्थिनींसाठी मोफत परिवहन बस प्रवास
सोलापूर महापालिका परिवहन व्यवस्था उभारून कामगार, विद्यार्थी, महिला, कर्मचारी व दिव्यांग नागरिकांसाठी सुलभ बससेवा देण्याचे नियोजन मांडण्यात आले आहे. विशेषतः महिलांना केंद्रस्थानी ठेवून शाळा व कॉलेजमधील विद्यार्थिनींसाठी शिक्षण, नोकरी आणि दैनंदिन प्रवासाकरिता परिवहन बस प्रवास पूर्णपणे मोफत करण्याचे महत्त्वाकांक्षी धोरण जाहीर करण्यात आले आहे. महिला सुरक्षा, आरोग्य व सक्षमीकरणासाठी आवश्यक उपक्रमांचाही प्रभावी समावेश या विकासनाम्यात करण्यात आला आहे. डिजिटल व आधुनिक प्रशासन प्रणाली राबवून पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त आणि गतिमान स्मार्ट प्रशासन देण्याचा निर्धारही महाविकास आघाडीने व्यक्त केला आहे. शहराचा सर्वांगीण व संतुलित विकास साधण्यासाठी ही ठोस विकासदृष्टी असल्याचे मत मांडण्यात आले.
येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या महापालिका निवडणुकीत सोलापूरकर मतदारांनी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांना अमूल्य मत देऊन प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहन प्रकाशन सोहळ्यात उपस्थित सर्व नेत्यांनी केले.
महाविकास आघाडी जाहीरनामा ठळक मुद्दे —
एक दिवसाआड शुद्ध पाणीपुरवठा, उजनीच्या पाण्याचे योग्य नियोजन
सक्षम परिवहन व्यवस्था : महिला, विद्यार्थी, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास.
प्रत्येक प्रभागात अद्ययावत स्ट्रीट लाईट.
घंटागाड्यांची संख्या वाढवून दररोज कचरा उचल, शास्त्रोक्त विल्हेवाट व स्वच्छता.
प्रदूषणमुक्त शहर : ड्रेनेज व्यवस्था सक्षम करून आरोग्यपूरक वातावरण.
सर्व उद्याने विकसित, अतिक्रमणमुक्त बाग-बगीचे, चिल्ड्रन पार्क व नाना-नानी पार्क उभारणी.
खड्डेमुक्त टिकाऊ रस्ते अत्याधुनिक पर्यावरणपूरक प्लास्टिक/ग्रीन रस्ते
महापालिका शाळामध्ये संगणक शिक्षण, प्रयोगशाळा, पाणी व क्रीडा सुविधा.
सशक्त आरोग्य सेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल
आयटी पार्क : सुशिक्षित तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात नवे रोजगारनिर्मिती केंद्र.
सांस्कृतिक विकास : जुळे सोलापूर भागात भव्य नाट्यगृह, उद्यान व बसस्थानक उभारणी.
















