नायगांव – रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली घटना समाजमन हादरवून टाकणारी असून, गोमातेच्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्याला पायदळी तुडवत गोवंशीय मांसाची बेकायदेशीर तस्करी करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. 17 जानेवारी 2026 रोजी दुपारी नांदेड–हैदराबाद महामार्गावर केरूर ते आदमपूर फाटा दरम्यान आदमपूर शिवारात ही धक्कादायक कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्बास महेमुद खुरेशी (वय 46, व्यवसाय चालक, रा. इस्लामपुरा, इतवारा, नांदेड) हा आरोपी पिकअप वाहन क्रमांक MH 26 BE 3742 मधून अंदाजे 350 किलो गोवंशीय मांसाची अवैध वाहतूक करत होता. पांढऱ्या रंगाच्या पोत्यांमध्ये भरलेले हे मांस प्रति किलो 200 रुपये दराने सुमारे 70 हजार रुपयांचे असून,विक्रीच्या उद्देशाने नांदेडहून हैदराबादकडे नेले जात होते.
महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियमा चे गंभीर उल्लंघन करत समाज भावनांशी खेळ करणाऱ्या या प्रकाराची माहिती मिळताच रामतीर्थ पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. फिर्यादी पोलीस कर्मचारी प्रकाश गोरखनाथ बेळीकर यांच्या तक्रारीवरून कलम 5(क) व 9(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्ह्याची नोंद दि. 17 जानेवारी रोजी सायंकाळी 4.35 वाजता करण्यात आली.
या कारवाईत पोलिसांनी गोवंशीय मांसासह पिकअप वाहन असा एकूण 3 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशा नुसार ही कारवाई करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार सुर्यवंशी (पोहेका/1882) करत आहेत. या संपूर्ण प्रकरणावर प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हराळे यांचे नियंत्रण आहे.
गोमातेच्या रक्षणासाठी कायदे अस्तित्वात असताना देखील अशा अमानुष आणि बेकायदेशीर कृत्यांची पुनरावृत्ती होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. मात्र रामतीर्थ पोलिसांच्या या ठोस कारवाईमुळे गोवंश तस्करी करणाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला असून,भविष्यात अशा गुन्ह्येगारा वर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असा संदेश प्रशासनाने दिला आहे.

















