सोलापूर – राज्यातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे नाव जोरदार चर्चेत आले आहे. भाजपमधील संघटनवाढ, निवडणूक व्यवस्थापन आणि विकासनिधी खेचून आणण्याची क्षमता या बळावर त्यांनी मंत्रीपदासाठी मजबूत दावेदारी निर्माण केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असताना सचिन कल्याणशेट्टी यांनी सोलापूर जिल्ह्यात भाजपची ताकद केवळ वाढवली नाही, तर ती प्रत्यक्ष सत्तेत रूपांतरित करून दाखवली. सोलापूर महानगरपालिकेवर पहिल्यांदाच भाजपची एकहाती सत्ता आणण्यात त्यांची रणनीती निर्णायक ठरली. याशिवाय मैंदर्गी नगर परिषदेत प्रथमच भाजपची सत्ता स्थापन झाली, तर जिल्हा परिषदेतही पक्षाला बळकटी मिळाली.
अक्कलकोट पंचायत समितीत स्वबळावर सभापतीपद मिळवून देत त्यांनी स्थानिक राजकारणात भाजपचा प्रभाव वाढवला. याचबरोबर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीतही प्रभावी राजकीय डावपेच रचत आपले वर्चस्व सिद्ध केले.
अक्कलकोटपुरते मर्यादित न राहता उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळसह जिल्ह्यातील विविध भागांत भाजपची पकड मजबूत करण्यासाठी त्यांनी आक्रमक पद्धतीने काम केले. विविध पक्षांतील प्रभावी नेते, माजी आमदार आणि कार्यकर्त्यांना भाजपमध्ये आणून संघटन अधिक बळकट करण्यात त्यांचा मोठा वाटा असल्याचे मानले जाते.
विकासकामांच्या बाबतीतही त्यांनी ठसा उमटवला असून, मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणणारे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे. संघटन, विकास, निवडणूक जिंकण्याची क्षमता आणि पक्ष विस्तार या चारही आघाड्यांवर सातत्याने काम केल्याने त्यांचे राजकीय वजन वाढले आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे पक्षश्रेष्ठींच्या विश्वासातील आमदार म्हणूनही सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे पाहिले जाते. मुख्यमंत्री यांच्याशी असलेला समन्वय,पक्षनिष्ठा,कठीण राजकीय परिस्थितीत संघटना उभी करण्याची ताकद आणि जिल्ह्यातील वाढता प्रभाव या सर्व बाबी पाहता आगामी मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना स्थान मिळाले तर ते कुणालाही धक्कादायक ठरणार नाही.उलट,त्यांच्या कामाची ती नैसर्गिक पोचपावती मानली जाईल.सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात सध्या अनेक नेते सक्रिय असले तरी संघटनकौशल्य,सत्ता मिळवण्याची क्षमता,पक्ष विस्तार आणि विकासाच्या मुद्द्यावर ठसा उमटवणारे नेतृत्व म्हणून सचिन कल्याणशेट्टी यांचे नाव आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर आगामी मंत्रिमंडळ विस्तारात अक्कलकोट तालुक्याला कॅबिनेट मंत्रीपदाचा मान मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींच्या राजकीय गणितावर अवलंबून असला, तरी सध्याची परिस्थिती पाहता सचिन दादा कल्याणशेट्टी हे मंत्रीपदासाठी सक्षम दावेदार म्हणून पुढे येत आहेत.






















