सिनेसृष्टीत वेगवेगळ्या विषयांवरील सिनेमांसोबत नवनवीन चेहरे ही रुपेरी पडद्यावर झळकताना दिसत असतात. हे नवे चेहरे चित्रनगरीत आपली वेगळी ओळख निर्माण करू पाहतायेत. सायली बांदकर हा असाच एक नवा चेहरा ‘गाभ’ या मराठी चित्रपटातून मोठ्या रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. शॉर्टफिल्म्स, अल्बम आणि रंगभूमीवर आपल्या अभिनयाची चुणूक दाखविल्यानांतर सायली आता रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवायला सज्ज झाली आहे. २०१७ च्या सवाई एकांकिकेमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच पारितोषिक पटकावणारी, हेमोलिम्फ, आय आम वूमन, मिसिंग जॅक यासारख्या हिंदी शॉर्टफिल्मस मध्ये केमिओ करणारी तसेच यदाकदाचित,अलबत्या गलबत्या या नाटकांमधून झळकलेली सायली ‘गाभ’ चित्रपटात अभिनेता कैलास वाघमारे सोबत स्क्रीन शेअर करणार आहे.
चित्रपटातील आपल्या भूमिकेविषयी बोलताना सायली सांगते की, ‘वास्तवतेच्या जवळ जाणारी भूमिका मला ‘गाभ’ या चित्रपटात साकारायला मिळाली आहे. फुलवा ही व्यक्तिरेखा मी यात साकारली आहे. गावखेड्याची पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटाची कथा रेड्याभोवती फिरते. प्राण्यांशी माझी फारशी जवळीक नाही मात्र या चित्रपटानंतर माझ्यात प्राण्यांबाबत वेगळी आत्मीयता निर्माण झाली.आपण जे बोलतो ते प्राण्यांना समजतं. त्यांना सांभाळताना कोडिंग किंवा काही टेक्निकलक्षात घेतलं की, आपली त्यांच्यासोबत गट्टी होऊ शकते. सामान्यांच्या जगण्याचं प्रतिबिंब यात प्रत्येकाला पहायला मिळेल. चित्रपटाबाबत सायली म्हणाली की, ”गाभ” हा चित्रपट माझ्यासाठी स्पेशल आहे. या चित्रपटाने मला नवी वाट दाखवली. कैलास यांच्याकडून मोलाचं मार्गदर्शन लाभलं. यापुढे एक प्रयोगशील अभिनेत्री म्हणून स्वत:ला सिद्ध करण्याचा नेहमीच प्रयत्न असेल.
‘गाभ’ चित्रपटाची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन अनुप जत्राटकर यांचे आहे. टाईमलॅप्स प्रोडक्शन आणि एजे मल्टिमीडिया प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे निर्माते सुमन नारायण गोटुरे आणि मंगेश नारायण गोटुरे आहेत. सहनिर्माते अनुप जत्राटकर आहेत.
आपल्या माजाला आलेल्या म्हशीसाठी रेडा शोधताना नायकामध्ये माणूस म्हणून होणारा बदल आणि त्याची गावच्या रांगड्या मातीच्या पार्श्वभूमीवरील ‘ गाभ’ ही कथा आपल्याला नक्कीच भावेल. २१ जूनला ‘गाभ’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.