सांगली जिल्ह्यात 26 ते 29 फेब्रुवारी या कालावधीत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत Supply Inspector व Upper Division Clerk या पदांची सरळसेवा परीक्षा तीन परीक्षा केंद्रावर सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राच्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी इमारतीपासून 100 मीटर सभोवतालच्या परिसरात परीक्षा कालावधीत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू केले असून पुढील कृत्यांना मनाई केली आहे.
परीक्षा वेळेत परीक्षेसंबंधी अधिकारी / कर्मचारी व परीक्षेस येणारे विद्यार्थी तसेच त्यांचे लेखनिक वगळता इतर कोणत्याही चार किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना परीक्षा केंद्राच्या ठिकाणी फिरण्यास, एकत्रित गटागटाने फिरणे व उभा राहण्यास मनाई केली आहे. तसेच परिक्षा केंद्राच्या परिसरातील झेरॉक्स मशिन, टेलिफोन बुथ, फॅक्स मशिन, ध्वनीक्षेपक यांचा परिक्षा संदर्भात कोणत्याही गैरप्रकारासाठी वापरण्यास मनाई केली असून परिक्षा केंद्रात विद्यार्थी तसेच त्यांचे लेखनिक यांना मोबाईल, पेजर, ब्लूटूथ, वायफाय डिव्हाईस, डिजिटल कॅमेरा, स्मार्ट वॉच, इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस व डिजिटल डिव्हाईस नेण्यास मनाई केली आहे.
सदर परीक्षा पद्मभूषण वसंतरावदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सांगली-तासगाव रोड, बुधगाव ता. मिरज, टेकवेअर टेक्नोलॉजी, विठ्ठल पाटील पॉलीटेक्निक, इनामधामणी, सांगली व वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ॲन्ड रिसर्च, भारती विद्यापीठ जवळ सांगली-मिरज रोड वान्लेसवाडी सांगली या महाविद्यालयाच्या ठिकाणी 26 ते 29 फेब्रुवारी या कालावधीत सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत होणार आहे.
हा आदेश कायदेशिर कर्तव्य बजावित असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना व धार्मिक विधी यांना लागू राहणार नाही, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत.